जळगाव – शहरातील १६ मार्केटच्या गाळेधारांनी संघटनेच्या आदेशानुसार मार्केट बंदचे आंदोलन तीन दिवसापासून सुरु केले हाेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
संघटनेच्या वतीने रविवारी पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाेबत बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले.त्यामुळे मार्केटचे व्यापाऱ्यांनी बंदचे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष डाॅ. शांताराम साेनवणे यांनी सांगितले.
मनपा विरोधात १६ अव्यवसायिक, अविकसीत मार्केट गाळेधारकांनी मार्केट बेमुदत बंद ठेवली होती. या प्रश्नी गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डाॅ. शांताराम साेनवणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे, राजस कोतवाल, पंकज मोमया, तेजस देपुरा आदी पदाधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथील संपर्क कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यावेळी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी मनपा आयुक्तांशी संपर्क साधून चर्चा केली. तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून गरीब, मध्यमवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गाळेधारकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्याचे सांगितले.
रविवारपासून गाळे नियमित सुरु
पालकंमत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारविनिमय करुन रविवारपासून (दि.७) गाळे नियमित सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुपारनंतर या १६ मार्केटमधील व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरु केली.