जळगाव – नशिराबाद येथील वराडसिम, नशिराबाद – भागपूर, नशिराबाद – जळगाव खुर्द या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण पूर्ण झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्याकडून जि.प उपाध्यक्ष लालचंद पाटील व सेवानिवृत्ती अभियंता शरद येवले यांचा शाल पुष्पगुच्छ व धान्य देऊन सत्कार करण्यात आला आहे. तसेच हे काम ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्य ने पूर्ण झाला असल्याचे लालचंद पाटील यांनी सांगितले.
जळगाव शहरापासून थोड्याच अंतरावर असलेले नशिराबाद हे गाव बाजारपेठेचे असल्याने आजू-बाजूच्या परिसरातील नागरिक व शेतकरी बांधव नेहमी नशिराबाद गावातून कडून ये-जा करत असतात. परंतु या तिन्ही रस्त्यांना दर्जोन्नती नसल्याने या रस्त्याचे मजबुती व डांबरीकरण होऊ शकत नव्हते. परिणामी त्या परिसरातील शेतजमीन बागायती असून सुद्धा शेतकऱ्यांना रस्त्याअभावी बागायती पिकांसाठी वंचित रहावे लागत होते. त्या अनुषगांने जि.प उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी गेल्या २ ते ३ वर्षांपासून सातत्याने जिल्हा परिषद ते मंत्रालयस्तरापर्यंत पाठपुरावा करून रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळवून दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या निधीतून तिन्ही रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. यावेळी शरद येवले, वामन चौधरी, नितीन चौधरी, सचिन महाजन, अनिल झटके, प्रवीण पाटील, महेश धोंडे, ललित बऱ्हाटे, चंद्रकांत चौधरी, हेमंत नेहते, ललित येवले यासह इतर शेतकरी व नागरिक उपस्थित होते.