नवी दिल्ली – कोरोनाच्या संसर्गामुळे देशभर लॉकडाउन लागू करण्यात आल्याने सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे. त्याचप्रमाणे याचा शिक्षण व्यवस्थेवर देखील दूरगामी परिणाम झाले आहेत. सर्वच भागांतील शाळा दीर्घकाळ बंद राहिल्याने देशाला याची मोठी आर्थिक किंमत देखील मोजावी लागू शकते. हा फटका साधारणपणे चारशे अब्ज डॉलर पर्यंत असू शकतो, असे जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
केवळ शाळा बंद राहिल्याने दक्षिण आशियातील देशांना ६२२ अब्ज डॉलरच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. परिस्थिती आणखीनच चिघळली तर हे नुकसान ८८० अब्ज डॉलरच्या घरामध्ये जाऊ शकते. प्रादेशिक पातळीवर भारताला याचा सर्वाधिक फटका बसणार असून अनेक देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये यामुळे मोठी घसरण होऊ शकते अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
बिट ऑर ब्रोकन? इन्फॉर्मेलिटी अँड कोव्हिड-१९ इन साऊथ एशिया’ या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. दक्षिण आशिया २०२० मध्ये आतापर्यंतच्या सर्वांत वाईट मंदीला सामोरे जाणार असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे.
सध्या शाळा बंद असल्याने मुलांवर असंख्य बंधने येत आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही पातळ्यांवर ३९१ दशलक्ष मुले शाळेपासून दुरावली आहेत, यामुळे त्यांच्या अध्ययनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक देशांनी मुलांना कोरोना काळात शिक्षण देण्याचा प्रयत्न केला खरा पण दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोचणे शक्य झालेले नाही. कोरोनामुळे ५.५ दशलक्ष मुले ही शिक्षण व्यवस्थेपासून दुरावली असल्याची शक्यता या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.