जळगाव – कोरोनाचे नवे स्ट्रेन महाराष्ट्रात आढळलेले आहेत. अमरावती, अचलपूर, अकोला अशा शहरांतून लॉकडाऊन पूर्ववत लागू करण्यात आला आहे. पुणे, जळगावसह अनेक शहरांतून निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे.
एकुणात महाराष्ट्रात रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहेत. कोरोनाची दुसरी लाट उसळलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: 21 फेब्रुवारीला सायंकाळी लोकांनी स्वत:च उत्स्फूर्तपणे गर्दी टाळावी, मास्क वापरावा अशी आवाहने केली. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागू होईल, की नाही हे सर्वस्वी लोकांवर अवलंबून आहे, असा एकप्रकारे निर्वाणीचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांचे हे भाषण आटोपलेच होते आणि जळगावचे आमदार सुरेश भोळे उपाख्य राजूमामा यांनी एक पत्रक प्रसिद्धीला देऊन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आवाहनाला ठेंगा दाखविला आहे.
भोळे यांनी हा ठेंगा दाखवताना वरून भोळेपणाचा आवही आणलेला आहे, हे विशेष! कोरोनावरूनच मुख्यमंत्र्यांनी गर्दी न करण्याचे आवाहन केलेले आहे आणि कोरोनावरूनच गर्दी करावी, असे आवाहन भोळे यांनी केले आहे. कोरोना महामारीने घातलेल्या थैमानाने जनता त्रस्त असताना जनतेला सहकार्य व मदत करणे सोडून महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने मनमानी सुरू ठेवली आहे, असा आरोप भोळे यांनी केला आहे. महावितरण जनतेला विज बिलात सुट देणे, मदत करणे सोडून जनतेचे लाईट कनेक्शन कट करत आहे.
लोडशेडिंग वाढवत आहेत, असेही भोळे यांनी म्हटले आहे आणि या सर्वांच्या विरोधात ते महावितरणच्या निषेधार्थ भाजप जळगाव जिल्हा व महानगरच्या माध्यमातून 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आकाशवाणी चौकात ‘भव्य’ जेल भरो आंदोलन ते करणार आहेत. ‘भव्य’ हे विशेषणही त्यांनीच वापरले आहे. आंदोलनात उद्योजक, सामाजिक संघटना व विद्यार्थ्यांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे म्हणजेच गर्दी करण्याचे आणि म्हणजेच कोरोना पसरविण्याचे आवाहनही भोळे यांनी केले आहे. जिल्हा सरचिटणीस महेश जोशीं, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, मनोज भांडारकर हे पदाधिकारीही गर्दी वाढविणार आहेत. भाजपची बैठक जरी दुपारी झालेली असली तरी भाजपने हे पत्रक मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी केलेल्या आवाहनानंतर प्रसिद्धीला दिलेले आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनालाही आणि कोरोनालाही आमदार भोळे आणि त्यांचे कार्यकर्ते फाट्यावर मारणार आहेत, असा त्याचा अर्थ कुणी का काढू नये?