जळगाव प्रतिनिधी । शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार २० फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये शहरातील शहर वाहतूक शाखा आणि महापालिकेच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर कारवाई करत १०५ जणांकडून ५०० रूपयाप्रमाणे ५२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
जिल्ह्यात रूग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यातच जळगाव शहरातही संख्या अधिक प्रमाणावर वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये प्रत्येक नागरीकाला मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार शहर वाहतूक शाखा आणि महापालिका यांच्या वतीने गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांच्या पथकाने शहरातील घाणेकर चौक, बसस्थानक, भजेगल्ली, काव्यरत्नावली चौक, कोचींग सेंटर, अभ्यासिका केंद्र, सुभाष चौक या परिसरात धडक कारवाई केली आहे. बसस्थानकाच्या आवारात विद्यार्थी, आगार विभागातील कर्मचारी तसेच खासगी कोचिंग क्लासेसच्या संस्था चालकांवर विनामास्क न वापरल्याप्रकरणी प्रत्येकी ५०० रूपयांचा दंड आकारला आहे.
नागरीकांनी आपल्यासह आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, कोरोना टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे, तोडावर मास्क लावणे याची काळजी घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी केले आहे.
तसेच महानगरपालिका व रामानंद व जिल्हापेठ पोलिस स्टेशन यांच्या वतीने काव्यरत्नवली चौक व बहिणाबाई उद्यान येथे मास्क न घालणाऱ्या वाहन धारकांना 200 रु प्रति असे एकूण 9600 रु दंड करण्यात आला, कार्यवाही करतांना महानगरपालिका पालिकेचे आरोग्य अधिक्षक श्री एल बी धांडे, आरोग्य निरीक्षक कुणाल बारसे, सुरेश भालेराव, मुकादम उज्वल बेंडवाल, रामानंद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री अनिल बडगुजर साहेब,जिल्हापेठ पोलिस स्टेशन चे श्री शेंडे साहेब व दोन्ही पोलिस स्टेशन चे स्टाफ उपस्थित होते.


