जळगाव – जळगावातील शिरसोली ते वावदडा रस्त्यावर १९ रोजी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका ५५ वर्षीय व्यक्तीचा अनोळची मृतदेह आढळून आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद एमआयडीसी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
शिरसोली ते वावदडा रस्त्यादरम्यान मेहुर्या मंदिराजवळ १९ रोजी सायंकाळी ६.५० वाजेपूर्वी अंदाजे ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. शिरसोली येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळ गाठले व रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मिलिंद सोनवणे व पोलीस कॉन्स्टेबल सदानंद नाईक यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. याप्रकरणी डॉ. संदीप पाटील यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.