जळगाव, प्रतिनिधी – गेल्या १२ वर्षापासून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या सुप्रीम कॉलनीवासियांना अखेर अमृत योजनेद्वारे सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. गेल्या वर्षभरापासून महापौर सौ.भारती सोनवणे या सातत्याने करीत असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून शहरात अमृत योजनेद्वारे पाणी पुरवठा होणारा सुप्रीम कॉलनी हा पहिला परिसर ठरला आहे. भविष्यात परिसर कितीही वाढला तरी सुरळीत पाणी पुरवठा होईल अशी यंत्रणा परिसरासाठी उभारण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, पाणी सर्वात महत्वाचा विषय आहे. तुम्ही मंत्री असताना चारीद्वारे पाणी देत होते आम्ही पाईपलाईनद्वारे देतो. आता जलजीवन मिशन योजना आलेली आहे. पाण्यासाठी जिल्ह्यातील ७०२ गावांसाठी पक्ष विरहित कृती आराखडा तयार केला असून पाणी देण्यासाठी नवीन धोरण आखले आहे. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. महापौरांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे काम शक्य झाले. महापौरांचे आणि स्थानिक नगरसेवकांचे विशेष कौतुक करतो. १० कोटीबाबत आम्ही निर्णय घेतला आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दिले.
जळगाव शहर महानगरपालिका अमृत अभियान अंतर्गत सुप्रीम कॉलनीत नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याचा शुभारंभ शनिवारी माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांच्या हस्ते तर पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. महापौर सौ.भारती सोनवणे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ.गिरीष महाजन, आ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते पंपाचे पूजन करून आणि पंपाची विद्युत कळ दाबून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
कार्यक्रमाला महापौर सौ.भारती सोनवणे, आ.राजुमामा भोळे, आ.लताताई सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, एमआयएम गटनेते रियाज बागवान, शिवसेना गटनेते अनंत जोशी, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, विद्युत विभाग सभापती गायत्री राणे, नगरसेवक कैलास सोनवणे, गटनेते भगत बालाणी, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक अण्णा भापसे, जिजाबाई भापसे, नगरसेविका निता सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतिभा कापसे, मयूर कापसे, ऍड.शुचिता हाडा, दीपमाला काळे, प्रशांत नाईक, ज्योती चव्हाण, सुरेखा तायडे, प्रवीण कोल्हे, चेतन सनकत, जितेंद्र मराठे, पार्वताबाई भील, नितीन बरडे, महेश चौधरी, किशोर बाविस्कर, डॉ.चंद्रशेखर पाटील, नवनाथ दारकुंडे, कुलभूषण पाटील, नाशिक मनपा नगरसेवक योगेश हिरे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, संजय विसपुते, डॉ.राधेश्याम चौधरी, चंद्रकांत भापसे, भरत सपकाळे, धुडकू सपकाळे, सरिता कोल्हे, शोभा चौधरी, निला चौधरी, वंदना पाटील, विजय वानखेडे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, गोकुळ पाटील, मनोज काळे, मजीप्रा कार्यकारी अभियंता एस.सी.निकम, उपअभियंता बी.जी.पाटील, कनिष्ठ अभियंता श्री.झाडे, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, पाणी पुरवठा अभियंता सुशील साळुंखे, शामकांत भांडारकर, योगेश बोरोले, मक्तेदार प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे, आशिष भिरुड, विद्युत काम मक्तेदार सुनील पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज भांडारकर यांनी तर प्रस्तावना स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील यांनी केली. मनपा अभियंता शामकांत भांडारकर यांनी योजनेची सविस्तर माहिती सांगितली.
पाणी योजनांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद : आ.महाजन
माजी मंत्री ना.गिरीष महाजन म्हणाले की, जळगाव शहराला जे पाणी मिळतेय ते पाणी देण्याचे काम जामनेर तालुक्यातून होतेय याचा आम्हाला आनंद आहे. सुप्रीम कॉलनीवासियांना जो त्रास झाला त्याची कल्पना आम्हाला आहे. लोकांना पाणी देऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु आज त्यांना पाणी मिळणार आहे. प्रत्येकाला पाणी मिळावे हे अटलजींचे स्वप्न होते. नदीजोड प्रकल्प देखील त्यांचे होते परंतु सरकार गेले आणि योजना बासनात गुंडाळली गेली. अनेक ठिकाणी आजही १५ दिवस पाणी येत नाही. अर्थसंकल्पात पाणी योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. मनपात भाजपची सत्ता आहे आणि या प्रभागात तीनही नगरसेवक शिवसेनेचे आहेत तरीही योजना सर्वप्रथम याठिकाणी सुरू झाली हे एक आदर्श उदाहरण आहे. दोन्ही योजनेमुळे शहरात फार खड्डे झाले, धूळ झाली परंतु हे चित्र देखील बदलेल. भविष्यात सत्ता कोणाचीही असेल परंतु शहर आपले आहे आणि आपल्याला शहराचा विकास करायचा आहे. सर्व पदाधिकारी काम करीत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. कोरोना काळातील काम कौतुकास्पद आहे. कोरोनाचे संकट पुन्हा गडद होत आहे, खाजगी रुग्णालये फुल झाली असून आपण काळजी घेणे गरजेचे झाले आहे. प्रत्येकाने सतर्कता बाळगावी असे आवाहन माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी केले.
सतत पाठपुरावा केल्याचे सार्थक : महापौर
महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सांगितले की, तीन वर्षापूर्वी या परिसरात आलो असता काही नागरिकांनी आम्हाला पाण्याच्या समस्येबाबत सांगितले होते. महापौर पद मिळाल्यानंतर वर्षभर सतत यासाठी पाठपुरावा केल्यानेच आज ही योजना कार्यान्वित होणार आहे. शहरी जीवनमान उंचावण्यासाठी अमृत योजनेची संकल्पना स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची होती. जळगावातील सुप्रीम कॉलनीला आजवर कधीही सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही परंतु आता सर्वप्रथम अमृत योजनेचे पाणी सर्वप्रथम सुप्रीम कॉलनीला मिळणार आहे. आमच्या हातून आणखी एक चांगले काम झाले याचा आम्हाला अभिमान आहे. येणाऱ्या काळात सुप्रीम कॉलनीतील इतर सर्व परिसरात देखील पाईपलाईन टाकण्यात येणार असून पथदिवे देखील बसविले जाणार आहे. परिसरातील प्रत्येक घराला पाणी मिळेल याची ग्वाही महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिली.
गटनेते अनंत जोशी यांनी सांगितले की, महापौर सौ.भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे हे सुप्रीम कॉलनीसाठी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करीत होते. कोरोना काळात देखील त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागाला सर्वप्रथम पाणी मिळणार असून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे त्यांनी सांगितले.
अनेकांनी अमृत योजनेवर बोट दाखविले. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. आज सर्वप्रथम सुप्रीम कॉलनीला पाणी मिळत आहे ही बाब आनंदाची आहे. भारतात सर्वात जास्त आजार पाण्यामुळे होतात. प्रत्येकाला चांगले आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर अमृत योजना सुरू केली आहे. एमआयडीसीला २५ लाख देऊन आपण पाणी घेण्याचा देखील प्रयत्न केला होता परंतु हा भाग उंच असल्याने ते पाणी मिळू शकले नाही. तेव्हाच अभ्यास करून या परिसरासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. पूर्वी केवळ नियोजन नसल्याने आपण पाणी देऊ शकलो नाही. जळगावकरांना लवकरात लवकर २४ तास पाणी मिळेल अशी अपेक्षा आपण करूया. नळांना मीटर लावण्याची मनपाची परिस्थिती नसल्याने पालकमंत्री व माजी मंत्र्यांनी पाठपुरावा करून का प्रश्न सोडवावा अशी विनंती आ.भोळे यांनी केली.
एक तपानंतर मिळाले सुरळीत पाणी
जळगाव शहराच्या दक्षिण सीमेस औरंगाबाद महामार्गालगत अंदाजे १५ हजार लोकवस्ती असलेला सुप्रीम कॉलनीचा परिसर आहे. २००८ मध्ये जळगाव शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला सुप्रीम कॉलनी परिसर पुरेसा विकसित नसल्याने मुबलक पाणीपुरवठा होत होता परंतु गेल्या १२ वर्षात परिसर मोठ्याप्रमाणात वाढल्याने दैनंदिन पाणीपुरवठा अवेळी आणि कमी दाबाने केला जात होता. गेल्या १२ वर्षापासून नागरिकांची पाण्यासाठी नेहमी वणवण होत होती. अमृत योजनेंतर्गत नवीन भूमीगत पाणी साठवण टाकी, पंप घर तयार करण्यात आल्याने नागरिकांना तब्बल एक तपानंतर सुरळीतपणे पाणीपुरवठा होणार आहे.
परिसरात पसरले १५ किमी जलवाहिनीचे जाळे
अटल नवीकरण आणि शहरी परिवर्तन मिशन अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनीसाठी १५ लक्ष लिटर्सची उंच पाण्याची टाकी, १५ लक्ष लिटर्सची भूमीगत पाणी साठवण टाकी, पंप घर, ३५ एचपीचे २ पंप, १ लाख ४० हजार लिटर प्रतितास विसर्ग क्षमता, परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी ११० मिमीच्या १२८२९ मीटर, १४० मिमीच्या १७०० मीटर, १८० मिमीच्या ६१९ मीटर, २२५ मिमीच्या ३०० मीटर अशा एकूण १५ हजार ४४८ मीटर जलवाहिन्या परिसरात टाकण्यात आल्या आहेत.
योजनेपासून होणारे फायदे
अमृत योजना सर्वप्रथम सुप्रीम कॉलनीत कार्यान्वित होणार आहे. योजनेमुळे परिसरात पुरेसा व मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करता येईल, पाणी पुरवठ्याची वेळ नियंत्रित ठेवता येईल, पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होईल, पाणी पुरवठ्यात सातत्य राखले जाईल, पाणी साठवण व्यवस्था केलेली असल्याने पाणी पुरवठा केल्यानंतर देखील पुढील पाणी पुरावठ्यासाठी लागणारे पाणी उपलब्ध राहणार असून बंदच्या काळात देखील पाणी पुरवठा करणे सहज शक्य होणार आहे.
जागांचे भाव वधारले
सुप्रीम कॉलनी परिसरात आजवर पाणी टंचाई असल्याने जागांचे भाव कमी होते मात्र पाणी योजना पूर्ण होऊन कार्यान्वित होणार असल्याने जागांचे भाव २०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत. पाण्याची सुविधा मिळाल्यानंतर परिसरातील पथदिवे आणि रस्त्यांची समस्या देखील दूर होणार असल्याने परिसराला अधिक मागणी वाढणार आहे.