जळगाव – कोरोना प्रादुर्भाव होवू नये यासाठी तयार केलेल्या नियमांचे नागरीक पालन करीत नसल्याने जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात मे, जून महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. तशीच परिस्थिती आता जिल्ह्यात होवू द्यायची नसेल, पुन्हा लाॅकडाउन नको असेल तर सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून कोरोनोशी दोन हात करायचे आहे. ही लढाई पून्हा जिंकायची आहे, त्यासाठी सर्व जिल्हावासीयांनी साथ द्यावी. असे भावनात्मक आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.
ते म्हणाले की, जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 780 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हीटीचा रेट १० टक्क्यांपर्यंत पोचला आहे. धोका वाढलेला आहे. गतवर्षी जशी एप्रिल, मे, जूनमध्ये कोरोना बाधीतांची संख्या वाढली होती तशी आता वाढत आहे. भविष्यातील धोके लक्षात घेता जिल्ह्यातील बंद केलेली सर्व कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) सूरू करण्यात येत आहे. सर्व ठिकाणी ऑक्सीजन, औषधांचा साठा वाढविण्यात येत आहे.
संशयितांचा शोध सुरू
संशयित रूग्णांचा शोध घेण्यासाठी आपण सर्व्हेक्षण मोहीम सुरू केली आहे. सोबतच खासगी डॉक्टर, पॅथेलॉजी लॅब यांच्याकडूनही संशयित रुग्णांची माहिती जमा करीत आहेत. त्या रुग्णांना ट्रॅक करून त्यांची तपासणी करण्यात येत आहेत, लक्षणे असणा-यांवर तातडीने उपचार करीत आहेत. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही संशयितांची माहिती प्रशासनास द्यावी.
बेफिकिरी खपवून घेणार नाही
दिवाळीनंतर बाधीतांची संख्या घटली होती. मात्र आता नागरिकांची बेफीकिरी वाढली आहे. गर्दीत जाणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळले गेल्याने बाधीतांची संख्याही वाढत आहे. यापूढे बेफीकिरी खपवून घेतली जाणार नाही. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आज ४५१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाभरात पथके तैनात करण्यात आली आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ, मिरवणुका, हॉटेल, माॅल्स येथे नियमांचे पालन होण्यासाठी ही पथके लक्ष ठेवून आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत.
लग्नात एकावेळी फक्त ५० जणच हवेत
लग्न समारंभात होणा-या गर्दी मुळे अख्खे कुटूंब बाधित झाल्याचे निदर्शनास येत आहेत. तसेच मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यामुळे प्रादुर्भाव वाढत आहेत. त्यामुळे लग्न समारंभात एकावेळी केवळ पन्नास लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे. तेथे नियमांचे पालन होते किंवा नाही हे तपासणीसाठी भरारी पथके नेमण्यात आली आहे.
घाबरू नका समोर या…
कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर त्वरीत तपासणी करून घ्यावी. कोरोना झाला तर घाबरू नका. समोर या. लवकर उपचार केले तर निश्चितच बरे व्हाल. लक्षणे कमी असतील तर घरी आयसोलेशचा पर्याय उपलब्ध आहे.
कोरोनोशी लढण्याची आता दुसरी वेळ आहे. यापूर्वी आपण सर्वानी कोरोनाचा मुकाबला केला आहे. त्यामुळेच प्रादुर्भाव कमी झाला होता. आताही आपण सर्वांनी साथ द्या, नियमांचे पालन करा. अन्यथा लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही. असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटले आहे.