नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशामध्ये पुन्हा एकदा करोनाची लाट येण्याच्या मार्गावर आहे. कारण दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढतच जात आहे. दरम्यान, भारतामध्ये मागील २४ तासांमध्ये म्हणजेच शुक्रवारी जवळजवळ १४ हजार नवे करोना रुग्ण सापडले आहेत. करोनाबाधितांची दैनंदिन वाढ मागील २७ दिवसांमध्ये पहिल्यांदाच १४ हजारांच्या आसपास गेली आहे.
महाराष्ट्र, पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत.भारतामध्ये शुक्रवारी करोनाचे १३ हजार ९९३ रुग्ण आढळून आलेत. मागील २७ दिवसांमधील ही सर्वात मोठी वाढ आहे. शुक्रवारी एका दिवसात देशामध्ये १०१ जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या एक कोटी ९ लाख ७७ हजार ३८७ वर पोहचल्याची माहिती देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये शुक्रवारी करोनाचे सहा हजार ११२ नवे करोना रुग्ण आढळून आले. राज्यातील करोनामुक्त रुग्णांची शुक्रवारची संख्या दोन हजार १५९ इतकी होती. तर करोनामुळे देशभरात मरण पावलेल्या १०१ रुग्णांपैकी ४४ महाराष्ट्रातील होते. महाराष्ट्रामध्ये करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २० लाख ८७ हजार ६३२ इतकी झाली आहे. यापैकी १९ लाख ८९ हजार ९६३ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्यामध्ये करोनाचा संसर्ग झाल्याने मरण पावलेल्यांची संख्या ५१ हजार ७१३ वर पोहचली आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या रुग्णालयांबरोबरच करोना सेंटर्समध्ये ४४ हजार ७६५ जण उपचार घेत आहेत.
मध्य प्रदेशामध्ये शुक्रवारी करोनाचे २९७ नवीन रुग्ण आढळून आले. मध्य प्रदेशमधील करोनाबाधितांची संख्या दोन लाख ५८ हजार ८७१ वर पोहचली आहे. राज्यामध्ये २४ तासात करोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून करोनामुळे मरण पावलेल्याची संख्या तीन हजार ८४६ इतकी झालीय. मध्य प्रदेशमधील आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ५२ जिल्ह्यांपैकी २० जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. मध्यप्रदेशमध्ये शुक्रवारी सापडलेल्या करोना रुग्णांपैकी १२६ रुग्ण इंदूर तर भोपाळमध्ये ६८ रुग्ण आढळून आले.
छत्तीसगडमध्ये मागील २४ तासांमध्ये करोनाचे एकूण २५९ रुग्ण आढलून आळे आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या तीन लाख १० हजार ४६९ इतकी झाली आहे. शुक्रवारी छत्तीसगडमध्ये ३२ जणांनी करोनावर मात केली तर करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या तीन इतकी आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार रायपूर जिल्ह्यात ८७, दुर्गमध्ये ४९, राजनांदगावमध्ये ११, बालोदमध्ये चार, कबीरधाम आणि बेमेतरामध्ये प्रत्येकी एक, बलोदाबाजारमध्ये पाच, महासमुंदमध्ये आठ, गरियाबंदमध्ये पाच, बिलासपूरमध्ये ११, रायगडमध्ये १४, कोरबामध्ये तीन, जांजगीरमध्ये चांपामध्ये दोन, कोरियामध्ये १७ रुग्ण आढळून आले.