नवी मुंबई, वृत्तसंस्था : माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते भोलानाथ ठाकूर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भोलानाथ ठाकूर यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे नवी मुंबईसह दिघा विभागात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोलानाथ ठाकूर हे ठाण्यातील दिघा आनंद निवास या ठिकाणी राहतात. काल रात्री भोलानाथ ठाकूर त्यांच्या राहत्या घरी परतले. त्यानंतर ते त्यांच्या रुममध्ये झोपण्यासाठी गेले. भोलानाथ ठाकूर हे दररोज सकाळी 11.30 ते 12 च्या दरम्यान उठतात. मात्र आज ते सकाळी त्यांच्या रुममधून बाहेर न आल्याने घरातील सदस्यांनी त्यांच्या रुमचा दरवाजा ठोठावला.
पण त्यांनी आतून काहीही आवाज दिला नाही. त्यानंतर शेवटी त्यांच्या रुमचा दरवाजा तोडला. त्यावेळी भोलानाथ ठाकूर यांनी गळफास घेतला असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांच्या कुटुंबियानी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
दरम्यान सध्या पोलीस या प्रकरणाची अजून चौकशी करत आहेत. त्यांनी नेमकी आत्महत्या का केली? याचाही पोलिसांकडून शोध सुरु आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण नवी मुंबईकरांना धक्का बसला आहे. तसेच यामुळे दिघा विभागात शोककळा पसरली आहे. सध्या कळवा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
भोलानाथ ठाकूर नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 1 चे माजी नगरसेवक होते. भोलानाथ ठाकूर हे दिघ्यामधील आनंदनगर येथे वास्तव्यास होते. नाईक समर्थक गणले जाणारे भोलानाथ ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती.