जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णात पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव महापालिकेत बैठक घेतली.
तसेच शहरातील व्यापारी व व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले. कोविडच्या नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा सुध्दा त्यांनी दिला. याप्रसंगी आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त संतोष वाहुळे, शाम गोसावी, सहाय्यक आयुक्त पवन पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यापुढे शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, लाॅन्स, मंगल कार्यालये, मॉल्स, उद्याने, क्रीडांगण, सार्वजनिक प्रवाशी वाहतूक करणाऱ्या यंत्रणा या गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे बैठकीत सांगितले. यासोबत आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी गिऱ्हाईक जर मास्क वापरत नसेल तर त्यास सेवा देऊ नये असे आवाहन केले. सर्वानी स्वयंशिस्त पाळून कोरोनाचा धोका टाळावा असेही आयुक्त कुळकर्णी यांनी सांगितले.
मंगल कार्यालय व्यावसायिकांनी लग्नाची परवनागी देतांना लेखी स्वरुपात देण्यात यावी. तसेच कार्यक्रम घेणाऱ्याकडून संख्येची मार्यदा पाळली जात नाही अशी व्यथा मांडली. याबाबत समज दिल्यास हुज्जत घालत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी अशी मागणी केली. व्यावसायिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, वारंवार नियम तोडणाऱ्या व्यावसायिकांवर छापा टाकून कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली. मोठे इव्हेंट घेऊ नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. बैठकीत सर्व व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांनी प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वसन दिले.