जम्मू, वृत्तसंस्था – लष्करी जवानांनी बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये वेळीच आयईडी स्फोटके शोधून निकामी केली. त्यामुळे घातपाताचा मोठा डाव उधळला गेल्याचे मानले जात आहे.
मोठी वर्दळ असणाऱ्या जम्मू-पूँच महामार्गालगत राजौरी जिल्ह्यात एका ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर लष्कराच्या गस्ती पथकाने वेगवान हालचाली केल्या. महामार्गावरील वाहतूक तातडीने थांबवण्यात आली. तसेच, बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर नियंत्रित स्वरूपाचा स्फोट घडवून आयईडी नष्ट करण्यात आले. ती स्फोटके एका प्रेशर कुकरमध्ये फळं ठेवण्याच्या खोक्यात दडवून ठेवण्यात आली होती. स्फोट घडवण्याच्या उद्देशातून आदल्या रात्री दहशतवाद्यांनी ती स्फोटके पेरून ठेवल्याचा संशय आहे. मात्र, लष्करी जवानांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
स्फोटके निकामी करण्यात आल्याने सुमारे दोन तासांनी संबंधित महामार्गावरील वाहतूक सुरळित झाली. स्फोटके आढळल्याने संबंधित परिसरात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याचे सूचित झाले. त्यामुळे दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.