कल्याण, वृत्तसंस्था – आगामी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शहरात फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजपाने मनसेला दोन मोठे धक्के दिले. एकीकडे शहाराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन हातात बांधलं तर दुसरीकडे गटनेते मंदार हळबेंनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपाचा झेंडा हाती घेतला. शहरातील मनसेचे २ प्रसिद्ध चेहरे विरोधी पक्षाने हिरावल्याने मनसेला निवडणुकीआधीच फटका बसला.
मात्र मनसेतही मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घेण्यात येत आहेत, बुधवारी ठाणे, वसई येथील इतर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत कृष्णकुंज येथे प्रवेश घेतला, यात महिलांचा सहभाग मोठा होता, कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी पक्षाने जबाबदारी दिलेले अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश पार पडला, तेव्हा हा पक्षप्रवेश डोंबिवलीतील फोडाफोडीला उत्तर होतं का? असा सवाल काही पत्रकारांनी त्यांना केला.
तेव्हा कल्याण-डोंबिवलीचे उत्तर कल्याण-डोंबिवलतीच देणार आहे, आठ दिवस थांबा, आमदार राजू पाटील मोठा पक्षप्रवेश घडवून आणणार आहेत असा गौप्यस्फोट अविनाश जाधव यांनी केला. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत मनसे नेमकं कोणाला पक्षाला घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. कल्याण डोंबिवलीतील मनसेची वाताहत रोखण्यासाठी खुद्द राज ठाकरेंनी पाऊल उचलत २४ तासांत मनसेच्या शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची निवड केली होती.
कल्याण डोंबिवली महापालिकेत २०१२ च्या निवडणुकीत मनसेनं २७ जागा जिंकल्या होत्या. याठिकाणी २००९ च्या निवडणुकीत मनसेचे २ आमदार निवडून आले होते, कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेने बाजी मारली होती, परंतु २०१४ च्या निवडणुकीत याठिकाणी मनसेचे बुरूज ढासळले, २०१७ च्या निवडणुकीत मनसेचे १० नगरसेवक निवडून आले, त्यानंतर पुन्हा एकदा मनसेने याठिकाणी पक्षबांधणी केली आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकमेव आमदार राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण जागा पुन्हा मनसेकडे खेचून आणली. कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे, मागील महापालिका निवडणूक शिवसेना-भाजपाने वेगळी लढली होती.