नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (NCP) भाजपत प्रवेश केलेले उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) हे शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेणार आहेत. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम केल्यानंतर ते प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेणार आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे शरद पवारांची भेट घेणार आहेत. ६ जनपथ या शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी संध्याकाळी साडेपाच वाजता ही भेट होणार आहे. मात्र, या भेटीत नेमक्या कुठल्या विषयावर चर्चा होणार आहे याची माहिती अद्याप समजू शकलेली नाहीये.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी पुन्हा विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी पक्षाला रामराम केला आणि भाजपत प्रवेश केला. यानंतर या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उदयनराजे भोसले यांचा पराभवाचा सामना करावा लागला. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. मग, भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली.
नाना पटोले – उदयनराजे भोसले यांची भेट
काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट झाल्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण येत आहे. नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सोनिया गांधी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजे भोसले आणि नाना पटोले यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भेट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.