जळगाव : ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यावर निशाणा साधला. भाजपचे संकटमोचक नेते अशी ख्याती असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खडसेंनी टीकास्त्र साधलं.
गिरीश महाजन हे फडणवीस सरकारमध्ये जलसंपदा मंत्री होते. मात्र तरीही त्यांनी जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच अमळनेर तालुक्यातील पाडळी येथील निम्न तापी प्रकल्प रखडला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. यावेळी एकनाथ खडसे यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी उपस्थिती लावली, यावेळी ते बोलत होते.
जळगाव जिल्ह्यात भाजप मजबूत करण्यासाठी सर्वांनी मेहनत घेण्याचे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी भाजप कार्यालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत केले होते. यावेळी भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि आमदार राजूमामा भोळे अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.
‘मतभेद विसरा, कामाला लागा’
‘आपापसात काही मतभेद असतील, तर ते बाजूला ठेवून कामाला लागा. पुढे जिल्ह्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आहेत. ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे भविष्यात असलेल्या निवडणुकांची रंगीत तालीम करण्याची नामी संधी आपल्याला आली आहे. यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी’ असे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केले होते.
गिरीश महाजनांची उत्तर महाराष्ट्रात पक्षबांधणी
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर गिरीश महाजन जोरदार कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून पक्षबांधणीचे काम वेगात सुरु आहे. “राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना काय मिळतं हा खडसे आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांनी आमचा पक्ष सोडला आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे गवशे आहेत तेच जातील” असा टोला गिरीश महाजनांनी काही दिवसांपूर्वी लगावला होता.
भाजपला ताकद दाखवतो : खडसे
‘आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल’ अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली आहे. ‘जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील’, असा इशाराही एकनाथ खडसे यांनी दिला होता.
अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे साहेब, अनिलभाईदास पाटील, मा.आ. मनिष जैन, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते. #राष्ट्रवादीपरिवारसंवाद @EknathGKhadse @MLA_AnilPatil pic.twitter.com/RMUuqm1cPf
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 11, 2021