जळगाव – एमआयडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ईच्छादेवी पोलीस चौकीजवळ पोलीस अधिक्षक यांच्या पथकाकडून मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला असून पती-पत्नीलासुद्धा अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या कारवाई एमआयडीसी पोलीसांनी चौकीजवळच अवैधरित्या गुटखा विक्रीचे ठिकाणाकडे दुर्लक्ष असल्याचे सिद्ध होत आहे.
सिंधी कॉलनीत परिसरातील कंवर नगर, तांबापूरा परिसरात बेकायदेशीर गुटखा व सुगंधीत पान मसाला विक्री करणाऱ्या एकाच मालकाच्या दोन दुकान व घरावर अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाडून अचानक धाड टाकण्यात आली. यामध्ये सुमारे 2 लाख 98 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून एक फरार झाला. याप्रकरणी तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन पथके अन् तीन लाखाच मुद्देमाल चर्चा भलतीच..
सिंधी कॉलनी बेकायदेशीर गुटखा व सुगंधित पान मसाल्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक चिंथा यांनी तीन पथके तयार केली. ईच्छादेवी पोलीस चौकीजवळच असलेल्या रमेश जेठानंद चेतवाणी (रा. सिंधी कॉलनी) याच्या मालकीच्या खुशी ट्रेडर्स नावाच्या दोन दुकानांवर आणि राहत्या घरात तिघंही पथकांनी अचानक कारवाई केली. यात तिन्ही ठिकाणी छापा टाकून सुमारे २ लाख ९८ हजार ६३६ रूपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधीत पान मसाला हस्तगत करण्यात आला. मात्र तीनही ठिकाणी मिळून जवळपास तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची चर्चा दिवसभर होती. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत येणारी ईच्छादेवी पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर गुटखा साठविल्याने पोलीसांना इतके दिवस सुगाव न लागणे याविषयीसुद्धा आश्चर्य व्यक्त केले जात होते.
मुलगा फरार, पती-पत्नीला अटक
घर व दुकाने एकाच मालकिचे असून याप्रकरणी दुकानमालक रमेश जेठानंद चेतवाणी आणि शारदा रमेश चेतवाणी रा. सिंधी कॉलनी या पती-पत्नी असलेल्या दोघांना अटक करण्यात आली असून मुलगा दिपक रमेश चेतवाणी हा फरार झाला आहे. सहाय्यक फौजदार तुकाराम निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रविंद्र मोतीराया, प्रकाश कोकाटे, निलेश पाटील, कैलास सोनवणे, विजय काळे, महिला पो.कॉ. उषा तिवाणे, वैशाली सोनवणे यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोउनि रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, तुकाराम निंबाळकर, पो.ना. सुनिल सोनार, पो.ना. मिलींद सोनवणे., पो.कॉ. सुधीर सावळे, पो.कॉ. सचिन पाटील, महिला पोलीस कॉ. सपना येरगुंटला, महिला पो.कॉ. जयश्री बाविस्कर यांनी ही कारवाई केली.
गुटखा येतो कुठून…
पोलीस चौकीच्या शेजारी मोठ्याप्रमाणात गुटखा सापडत असेल तर शहरात गुटखा विक्रीला पोलीसांचे अर्थ पुर्ण अभय तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत असून सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी केलेली कारवाई अंतिम तपासापर्यंत जावून जिल्ह्यातील गुटखा माफियांना आळा बसविण्यात कारणीभूत ठरेल काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.