जळगाव : जालना – सिंदखेड राजा रस्त्यावर कार आणि ट्रक यांच्या झालेल्या भीषण अपघातात काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आसिफखान इस्माईल खान (रा़ मुक्ताईनगर) यांचा मृत्यु झाला. मुक्ताईनगर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव आणि अॅड. संतोष इंगळे (रा़ मेळसांगवे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे.
औरंगाबाद येथील काम आटोपून आसिफखान, आत्माराम जाधव आणि अॅड. संतोष इंगळे हे मंगळवारी रात्री कारने जालनामार्गे मुक्ताईनगर येथे येत होते. यावेळी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जालना – खिंदखेड राजा रस्त्यावर त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. त्यात खान यांचा जागीच मृत्यु झाला. जाधव व इंगळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी रात्री डॉ. जगदीश पाटील यांच्या हॉस्पिटलबाहेर एकच गर्दी केली होती. आसिफ खान यांच्या मृत्युमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


