जळगाव प्रतिनिधी । तांबापुरा परिसरात स्पिकरचा आवाज बंद करण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात परस्परविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांबापुरा परिसरातील गौतम नगर येथील रहिवाशी निर्मला नाना सपकाळे (वय-४६) हे घरी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता लाऊडस्पीकर चालू होते. यावेळी त्यांच्या शेजारी राहणारे फरहान शेख शब्बीर आणि अल्ताफ अब्बास खान यांनी जवळ येवून स्पीकरचा आवाज कमी करण्यासाठीचा दम देवून निर्मला सपकाळे डोक्याला दगड मारून फेकला त्यांच्या मुलांना शिवीगाळ केली. याप्रकरणी निर्मला सपकाळे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटातील फरहान शेख शब्बीर याने दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, शेजारी राहणारे शुभम उर्फ गुड्डू नाना सपकाळे याला स्पिकरचा आवाज कमी करण्याचे सांगितल्याचा राग येवून शुभम आणि सोनू नाना सपकाळे यांनी फरहान शेख शब्बीर याला आणि त्यांच्या बहिणीला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. शुभमने हातातील धारदार पट्टी उगारून फरहानच्या पोटावर वार केले.
याप्रकरणी फरहान शेख शब्बीर यांच्या फिर्यादीवरून शुभम सपकाळे आणि सोनू सपकाळे यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहे.