जळगाव, प्रतिनिधी । गोलाणी मार्केट परिसरात असलेल्या तायडे गल्लीत तिसर्या मजल्यावरील घरात मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीत घरातील लाकडी कपाट, कपडे, धान्य यासह २० ते २५ हजारांच्या संसारपयोगी वस्तू खाक झाल्या आहे. तिवारी गल्लीत बँकेच्या समोर असलेल्या बिल्डींगमध्ये तिसर्या मजल्यावर विनोद शिवबकस गंगवल (वय ७०) हे पत्नी अंजनाबाई, मुलगी पल्लवी यांच्यासह वास्तव्यास आहे.
तळमजल्यावर त्यांची पीठाची गिरणी असून गंगवल दाम्पत्य त्यावर उदरनिर्वाह भागवितात. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कुटुंबिय दुसर्या खोलीत बसलेले होते. यादरम्यान गॅलरीच्या बाजूच्या असलेल्या दुसर्या खोली अचानकपणे आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने गंगवल कुटुंबिय घराबाहेर पडले. तसेच बादलीने पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. तायडे गल्लीतील रहिवाशांकडून आगीची माहिती मिळाल्यावर तत्काळ महापालिकेचे अग्निशमन बंबाने घटनास्थळ गाठले.
अग्निशमन विभागाचे कर्मचारी अश्वजित घरडे, तेजस जोशी, राजू चौधरी, नितीन बारी, प्रकाश चव्हाण, सोपान जाधव, गंगाधर कोळी, युसूफ पटेल या कर्मचार्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन पाईप तिसर्या मजल्यावर पोहचविला. तसेच पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील कपडे, अंथरुण, गाद्या, चादरी, धान्य, भांडे ठेवण्याचे लाकडी कपाट, गोधड्या, खुर्च्या असे एकूण २० ते २५ हजारांचे साहित्य जळून खाक झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार देणार असल्याचे गंगवल यांनी बोलतांना सांगितले.