मुंबई – बँकेकडून घेतलेल्या कर्जामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने मुंबई गाठत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न केला होता. या शेतकऱ्याचं नाव महेंद्र देशमुख असं आहे. त्याने जानेवारी महिन्यात हा प्रयत्न केला होता. तुझा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल असं आश्वासन या शेतकऱ्याला देण्यात आलं होतं.
मात्र त्याच्या कर्जाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही म्हणून हा शेतकरी आज पुन्हा एकदा आपल्या पत्नीसह मातोश्री या ठिकाणी आला. त्याने मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. महेंद्र देशमुख हे रायगड जिल्ह्यातील शेतकरी आहेत. बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या महेंद्र देशमुख यांनी मातोश्रीबाहेर आज उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
बँकेच्या कर्जामुळे वैतागलेले शेतकरी महेंद्र देशमुख हे त्यांच्या पत्नी आणि लहान मुलीसह मातोश्रीवर आले होते. जानेवारी महिन्यात जेव्हा ते आले होते तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महेंद्र देशमुख तुम्हाला न्याय मिळेल असं म्हटलं होतं. मात्र अजूनही न्याय मिळालेला नाही असं सांगत आज महेंद्र देशमुख त्यांच्या पत्नी आणि मुलीसह मातोश्रीवर आले. त्यांनी उपोषणाला बसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
१५ मार्च २००८ रोजी महेंद्र देशमुख यांनी १० लाख २० हजार रुपये रक्कम कुटुंबातील सर्वांच्या नावे जमा केली. त्यापूर्वी २००६ आणि २००७ या वर्षाची खात्यातील एकूण जमा रक्कम अंदाजे २३ ते २४ लाखांपर्यंत होती. त्यासाठी त्यांनी स्वतःचे घर तारण ठेवले. त्या घराची रक्कम बँकेने जवळपास ८ लाख ठरवली. त्यानुसार अंदाजे ३२ लाखापर्यंत रक्कम बँकेकडे तारण ठरवण्यात आली. मात्र तरीही ४० लाख तारण मालमत्ता दाखवण्यासाठी ८ लाख कमी पडत होते. त्यामुळे ते प्रकरण बँकेकडे सर्व कागदोपत्री स्थगित राहिले.
या सर्व प्रकरणात तारण ठेवलेले जवळपास ३२ लाख रुपये परत मिळू नयेत, यासाठी कर्ज काढण्याआधीच बँकेने तीन कर्ज लेखी पत्र देऊन लादल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.