मुंबई, वृत्तसंस्था – अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या धक्क्यातून अद्याप कित्येक जण सावरले नाहीत तोपर्यंतच आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. श्रीवास्तव चंद्रशेखर असे आत्महत्या केलेल्या अभिनेत्याचे नाव आहे.
श्रीवास्तव चंद्रशेखर हा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. फिल्मी बीटच्या रिपोर्टनुसार चंद्रशेखर याने ४ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. त्याच्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, असे म्हटले जाते की, चंद्रशेखर गेल्या काही महिन्यांपासून मानसिक त्रासातून जात होता. शुक्रवारी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
श्रीवास्तव याने प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता धनुषसोबत काम केलेले आहे. २०१९ मध्ये त्याने एनई नोकी पायुम थोट्टामध्ये धनुषसोबत सहकलाकार म्हणून काम केले होते. तसेच तो वल्लमई थारायो या वेबसीरिजमध्येही त्याने काम केले होते.
दरम्यान, २२ जानेवारी २०२१ला कन्नड अभिनेत्री जयश्री रामय्या हिने आत्महत्या केली होती. तिने गेल्या वर्षी जूनमध्ये सोशल मीडियावर आत्महत्या करणार असल्याची पोस्ट फेसबूकवर अपलोड केली होती. डिप्रेशनमधून बाहेर येत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे तिने म्हटले होते.