मुंबई, वृत्तसंस्था – भोसरी एमआयडीसीतील भूखंड कमी किमतीत खरेदी केल्याच्या आरोपावरून अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची सुनावणी हायकोर्टाने 17 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली असून तोपर्यंत खडसेंविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये असे आदेश अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ला दिले आहेत.
पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड कमी किमतीत खरेदी केल्याच्या आरोपावरून खडसे यांना ईडीने यापूर्वी समन्स बजावले आहेत. तसेच ऑक्टोबर महिन्यात खडसेंविरोधात ईडीने ईसीआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी ज्येष्ठ काऊन्सिल आबाद पोंडा यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.