पिंपरी, वृत्तसंस्था – पिंपरी चिंचवड शहरातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पालिकेमार्फत राबवित असलेल्या पार्किंग पॉलिसीला स्थायी समितीने बुधवारी (दि.3) मान्यता दिली. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 मार्चपासून शहरातील 6 भागांत केली जाणार आहे.
शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी तसेच, स्मार्ट सिटीची गरज ओळखून पालिकेने पार्किंग पॉलिसी राबविण्याचा निर्णय घेतला. बीआरटीएस विभागाच्या या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने 2018 ला मंजुरी दिली. प्रशासनाने सप्टेंबर 2019 ला निविदा प्रक्रिया राबविली. पार्किंगचे दर कमी असल्याने, केवळ एका वर्षांचा कालावधी व संपूर्ण शहराची एकत्रित निविदा असल्याने त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या योजनेचा सुधारित प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला. त्यास 22 जून 2018 ला मंजुरी मिळाली.
आता स्थायी समितीची मान्यता मिळाल्याने येत्या आठ दिवसांत संबंधित एजन्सीला वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पार्किंग योजनेला 1 मार्चपासून सुरूवात केली जाणार आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना आळा बसणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
या ठिकाणी असणार सशुल्क पार्किंग
भाग 1 : निगडी वाल्हेकरवाडी स्पाइन रस्ता, पुणे-मुंबई जुना महामार्ग, टिळक चौक ते प्राधिकरणातील बिग इंडिया चौक, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, दापोडी रेल्वे स्थानकाजवळील दोन्ही बाजू.
भाग 2 : वाल्हेकरवाडी रस्ता, हिंजवडी ते चिंचवड स्टेशन, काळेवाडी फाटा ते एम्पायर इस्टेट.
भाग 3 : केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन, एम्पायर इस्टेट ते देहू-आळंदी रस्ता, स्पाइन रस्ता.
भाग 4 : थेरगाव गावठाण रस्ता, थेरगाव फाटा ते प्रसुंधाम लिंक रस्ता, औंध-रावेत रस्ता.
भाग 5 : टेल्को रस्ता, नाशिक फाटा ते मोशी रस्ता.
भाग 6 : निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, उड्डाणपुलाखाली, नाट्यगृह व मोकळ्या जागा.
इतके पैसे मोजावे लागणार
एका तासासाठी दुचाकी व रिक्षासाठी 5 रूपये, मोटारी, टेम्पोसाठी 10 रूपये, मिनी बससाठी 25 रूपये, ट्रक व खासगी बससाठी 100 रूपये शुल्क आकारणी केली जाणार आहे. पार्किंगसाठी शहराचे 6 भाग केले आहेत. रात्रीच्या एका दिवसाचे आणि वर्षभराच्या पार्किंगसाठी दर निश्चित केले आहेत.