पुणे – ‘झपाटलेला’ या मराठी चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ची भूमिका साकारून नावारूपास आलेले ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे आज सायंकाळी पुण्यात वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले.
कडकोळ हे अभिनेता आणि लेखक होते. त्यांनी मराठी चित्रपट, नाटक यांसह दूरचित्रवाहिनी मालिकांतून अभिनय केला आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
राघवेंद्र कडकोळ यांनी कृष्णधवल चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरूवात केली होती. कडकोळ हे प्रामुख्याने ‘झपाटलेला’ या चित्रपटातील ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका साकारल्याने ते जास्त प्रसिद्धीझोतात आले होते.
राघवेंद्र कडकोळ यांनी ‘अश्रूंची झाली फुले’, ‘रायगडला जेव्हा जाग येते’ यांसारख्या अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांची ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील ‘धर्माप्पा’ ही भूमिकाही प्रचंड गाजली. ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘कुठे शोधू मी तिला’, ‘गौैरी’, ‘सखी’ या मराठी चित्रपटांमध्ये, तर ‘छोडो कल की बाते’ या हिंदी चित्रपटात काम केले आहे. कडकोळ यांनी ‘गोल्ड मेडल’ नावाचे पुस्तकही लिहीले आहे. चित्रपट, नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
राघवेंद्र कडकोळ यांना मिळालेले पुरस्कार –
– बालगंधर्व परिवारातर्फे ज्येष्ठ नाट्य-चित्रपट अभिनेते जीवनगौरव पुरस्कार
– अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’