जळगांव :- महाराजस्व अभियान हे सर्वसामान्यांसाठी वरदान असून उत्तर महाराष्ट्रात प्रथमच विविध खात्याच्या लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध दाखल्यांसह मदतीचे वाटप करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पातळीवर याच प्रकारे अभियान राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाळधी येथे आज ( दि.२५ रविवारी) रोजी आयोजित महाराजस्व अभियानाच्या विस्तारीत समाधान योजतेंतर्गत आयोजित समाधान शिबिराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.*
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, पं. स. सभापती मुकुंदराव नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, सरपंच प्रकाश पाटील, चंदू माळी, अनिल कासट, चंदन कळमकर, सचिन पवार याची उपस्थित होती.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आजच्या समाधान शिबिराच्याच दिवशी आपल्या विधानसभा विजयाला एक वर्ष पूर्ण होत असल्याचा योगायोग नमूद केला. ते म्हणाले की, या वर्षी कोरोनाच्या आपत्तीमुळे शासनाला अनेक महत्वाच्या योजनांना निधीची कमतरता असली तरी शासनाने जनहिताचे काम सुरू ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील माझे कुटुंब- माझी जबाबदारी या व्यापक मोहिमेमुळे कोरोनाचा प्रकोप कमी झाला असला तरी आपण सर्वांनी सजग राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तर पाळधी येथील कार्यक्रमाप्रमाणे प्रत्येक तालुक्यावर शिबिरे घेण्यात यावीत असे निर्देश देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.
महाराजस्व अभियान अंतर्गत पाळधी येथे आयोजित समाधान शिबिरात एकूण १० स्टॉल लावण्यात आले होते. यात पुरवठा, संजय गांधी निराधार योजना , कृषी , आरोग्य , विमा लाभ , आधार नोंदणी , सीएससी केंद्र , पंचायत समिती विभाग, रक्तदान शिबिर, वर्ल्ड व्हिजन इंडिया , असे विविध स्टॉल लावण्यात आले होते . यात आत्महत्या केलेल्या 5 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना उभारी योजनेअंतर्गत खते बियाणे औषधांचे किट वाटप, पालकमंत्री शिव / पाणंद रस्ते अंतर्गत तालुक्यातील ८ किलोमीटरचे अतिक्रमित शिव रस्ते मोकळे करुन मुरुमीकरण करण्यात आले. तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार योजनेअंतर्गत रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्यात १५५ गटई स्टॉल मंजूर करण्यात आले असून त्यात धरणगाव तालुक्यात २३ गटई स्टॉल वाटप करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब योजने अंतर्गत तालुक्यातील २८ महिलांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे असे ५ लक्ष ६० हजाराचे चेक वाटप करण्यात आले. पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत तालुक्यातील ४ लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी १ लक्ष १८ हजार ७४० रुपयांचा धनादेश देण्यात आला. तालुक्यातील शौचालय बांधकामासाठी ११२ लाभार्थी लाभार्थ्यांना १३ लाख ४४ हजार रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला.
सर्वात महत्वाचे म्हणजे वर्ल्ड व्हिजन इंडिया मार्फत पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यात तालुक्यातील कोरोनाग्रस्त १० व्यक्तींना घरपोच प्रत्येकी ०५ हजार रुपयेचे चेक देण्यात आले. ३ हजार कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून १ हजार रुपयांचा चेक व १ हजार रुपयांचे धान्य देण्यात आले. १२० महिलांना प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या बकरी वाटप करण्यात आल्या. तालुक्यातील हजारो कुटुंबांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.