जळगाव : शहरात दिवसेंदिवस वाळू माफियांची मजल वाढली आहे. अवैध वाळू माफियांवर वचक बसवण्यासाठी महसूल पथक गेल्या काही दिवसांपासून धडक कारवाई करताना दिसून येत आहे. याच पाश्र्वभूमीवर महसूल पथकाने अवैध वाळू वाहतुकीचे डंपर जप्त केले होते.
हे जप्त केलेले अवैध वाळु वाहतूकीचे डंपर सोडायला लावल्याचे प्रकरण जिल्हा पेठ पोलिस स्टेशन येथील कर्मचा-याच्या चांगलेच अंगाशी आले आहे . जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे कार्यरत कर्मचारी संदीप शालीग्राम पाटील यास पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी निलंबित केल्याचे समोर आले आहे. महसुल पथकाने जळगाव शहरातील पांडे चौकात १५ ऑक्टोबरला सकाळी वाळूची अवैध वाहतूक करणारे डंपर (एमएच १९ सीवाय ३६०७) अडवले होते. डंपर चालकाने या घटनेची माहिती लागलीच मालकास दिली.
डंपर मालकाकडून या घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिस स्टेशनचा कर्मचारी संदीप पाटील याने पांडे चौकात हजेरी लावली. हे डंपर आपल्या यादीतील असल्याचे सांगून सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र पथकाने त्याला जुमानले नाही. ते वाळूचे डंपर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणले गेले.
पोलीस स्टेशनला जमा केलेल्या डंपरची चावी चालकास देत निघून जाण्याचे सांगण्यात आले. मात्र ठाणे अंमलदाराने या प्रकाराला विरोध केला. सदर प्रकाराची पोलिस अधिक्षक डॉ. मुंढे यांनी चौकशी केली. याबाबतचा अहवाल मागवण्यात आला असता त्यात कर्मचारी संदीप पाटील दोषी आढळून आला. त्याला चौकशीअंती निलंबीत करण्यात आले आहे.
तसेच लोकेश महाजन हा डंपर मालक असून मयुर पाटील हा त्यावरील चालक असल्याचे समजते. या डंपर मालकास तलाठ्यांनी २ लाख ३९ हजार ११२ रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे.