नवी दिल्ली: अयोध्येत राम जन्मभूमी येथे राम मंदिर नव्याने उभारण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या संख्येने देणग्या दिल्या जात आहेत. आतापर्यंत श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जवळपास सहाशे कोटींचा निधी संकलित झाला आहे. यातील १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम थेट चेकद्वारे देण्यात आली आहे. राम मंदिरासाठी संकलित होत असलेला निधी रामनगरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या शाखांमध्ये जमा होत आहे. मकर संक्रांतीपासून राम मंदिरासाठी निधी संकलन सुरू आहे. दररोज जमा होत असलेला निधी बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केला जात आहे. राम मंदिरासाठी देणगी देणाऱ्या प्रत्येकाला संबंधित पैशांची पावती दिली जात आहे.
आतापर्यंत फक्त स्टेट बँकेतच ३०० कोटींपेक्षा जास्त निधीचे संकलन झाले आहे. उर्वरित निधी पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँकांमधील खात्यांमध्ये जमा होत आहे. बँकांच्या खात्यांमध्ये ४७५ कोटींपेक्षा जास्त रक्कम झाली आहे. कोट्यवधी रुपयांचे चेक या आठवड्यात क्लीअर होतील आणि पैसे जमा होतील. पण संबंधित रकमेच्या पावत्या चेक मिळताच देण्यात आल्या आहेत.
भूमीपूजन होण्याच्या आधी श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट स्थानिक स्टेट बँकेच्या शाखेत एक खाते उघडले होते. या खात्यातही अनेकांनी राम मंदिरासाठी दान केले आहे. तसेच या खात्यामध्ये रामलल्ला विराजमान यांच्यासमोर ‘चढावा’ स्वरुपात ठेवल्या जाणाऱ्या पैशांना जमा केले जात आहे. दानाच्या स्वरुपात मिळालेली रक्कम तसेच ‘चढावा’ स्वरुपात आलेल्या पैशांची नोंद ठेवली जात आहे. दानाच्या पावत्या तातडीने दिल्या जात आहेत. या खात्यात आतापर्यंत १२५ कोटींच्या घरात रक्कम जमा झाली आहे.
राम मंदिराच्या निर्मितीसाठी निधी संकलन सुरू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह देशातील अनेक राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री तसेच लोकप्रतिनिधींनी देणग्या दिल्या आहेत. उत्तराखंडच्या ऋषीकेशमध्ये नीलकंठ परिसरातील एका गुहेत साठ वर्षांपासून वास्तव्यास असलेले ८३ वर्षांचे संत शंकर दास (फक्कड बाबा) यांनी रा मंदिरासाठी एक कोटी रुपयांचा चेक दिला. गुजरातमधील हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी ११ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. सुरतचे व्यापारी महेश कबुतरवाला यांनी ५ कोटी आणि लवजी बादशहा यांनी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. रायबरेलीतील सुरेंद्र सिंह यांनी १ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली आहे. विश्व हिंदू परिषद निधी संकलन करत आहे. निधी संकलन २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून निधी संकलित केला जाणार आहे. निधीचा वापर भव्य राम मंदिर बांधण्यासाठी तसेच मंदिर बांधल्यानंतर ट्रस्टमार्फत केल्या जाणार असलेल्या अनेक धार्मिक तसेच समाजोपयोगी कामांसाठी होणार आहे. राम मंदिरासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून ते व्यापारी, राजकारणी, सेलिब्रेटी, श्रीमंत अशा सर्वच थरांतील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या जात आहेत. रामावरील श्रद्धा आणि निधीचा वापर योग्य प्रकारे होईल हा विश्वास असल्यामुळेच नागरिकांकडून स्वच्छेने मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या जात आहेत.