पुणे विमानतळावरील व्यावसायिक विमानांची उड्डाणं १४ दिवसांसाठी बंद राहणार आहेत. भारतीय हवाई दलानं याबाबतची माहिती दिली. २६ एप्रिल २०२१ ते ९ मे २०२१ या काळात विमानतळाची सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.
पुणे : पुणे विमानतळावरील व्यावसायिक विमानांची उड्डाणं १४ दिवसांसाठी बंद राहणार आहेत. भारतीय हवाई दलानं याबाबतची माहिती दिली. २६ एप्रिल २०२१ ते ९ मे २०२१ या काळात विमानतळाची सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. लोहगाव येथे असलेल्या पुणे विमातळावरुन हवाई दलाच्या एअर बेसवरुनच व्यावसायिक विमानांचे नियंत्रण केले जाते. सध्या या विमानतळावर रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळेत सर्व प्रकारच्या विमानांचे उड्डाणं आणि लँडिंग सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
यासाठी रात्रीच्या १० विमान सेवा या दिवसाच्या वेळेत बदलण्यात आल्या आहेत. लॉकडाउनच्या आधी पुणे विमानतळावर २,५३० मीटरची एकच धावपट्टी कार्यरत होती. यावरुन दिवसभरात साधारण १७० विमान उड्डाण होतं होती, अशी माहिती विमानतळ संचालकांनी दिली. १५ सप्टेंबरपासून धावपट्टीचं लोहगावपासूनचं अंतर २,१३३ मीटरनं कमी करण्यात येणार आहे. तसेच वाघोलीच्या शेवटापर्यंत २८ क्रमांकाच्या धावपट्टीचं काम पुढील ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबत सर्व विमान कंपन्यांना कळवण्यात आलं असून त्यानुसार ते आपल्या उड्डाणांच्या वेळा निश्चित करणार आहेत,” अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली होती.
पुणे विमानतळावरुन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण होतात. विशेषतः पश्चिम आशियातील देशांमध्ये इथून विमान जातात. विमानांच्या उड्डाणांच्या संख्येत वाढ होत असल्याने नव्या टर्मिनलची उभारणी करणे आणि धावपट्ट्यांमध्ये वाढ करणे गरजेचे ठरले होते. हवाई दलामार्फत गेल्या वर्षी २६ ऑक्टोबरपासून धावपट्टीचे दुरुस्तीकाम केले जात आहे. या कामाला गती देण्यासाठी एप्रिल-मे महिन्यात १४ दिवस विमान उड्डाणे पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत.