जळगाव, प्रतिनिधी । अवैधरित्या गांजाची वाहतुक करणार्या ट्रकची पायलटींग करणार्यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याची दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
भुसावळ येथून (एमएच 42 टी 2125) या ट्रकमध्ये नारळाच्या झाडाने भरलेल्या ट्रकमध्ये गांजाची तस्करी होत असल्याचे माहिती तत्कालीन सहाय्यक पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक विनायक लोकरे, पोउनि विशाल सोनवणे यांच्यासह एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने भुसावळ ते धुळे महामार्गावरील रॉयल इन्फील्डच्या शो रुम समोर ट्रक अडविला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 636 किलो 38 लाख 20 हजार 440 रुपये किंमतीचा गांजा आढळून आला होता. दरम्यान पोलिसांनी ट्रक अडविताच या ट्रकची पायलटींग करणारी (एमएच 28 एजे 2507) क्रमांकाची कार देखील थांबली होती. परंतु पोलिसांकडून ट्रकची तपासणी होत असल्याचे बघताच कार याठिकाणाहून पसार झाली होती. याप्रकरणी (26 ऑगस्ट 2020) रोजी एमआयडीसी पोलिसात ट्रकचालक मुक्तार अब्दुल रहिम पटेल (वय 24, रा. लोहारा ता. बाळापूर, जि. आकोला) याला अटक करण्यात आली होती. तर कारमधील संशयित आरोपी फरार झाले होते.
ट्रक चालक मुक्तार पटेल व कारमधील अरमान चिंधा पटेल, आशिक सुलेमान पटेल व शेख आसिक शेख मुनाफ या चौघांचे मोबाईल सीडीआर व एसडीआरबाबत माहिती घेतली असता. ते सर्व जण एकमेकांच्या संपर्कात असल्याचे निषपन्न झाले. त्यानुसार आज एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी आशिक सुलेमान मौले (पटेल) (वय 27, रा. समृद्धी नगर मेहरुण) याला अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याची ३ फेब्रुवारी रोजी पर्यंत पोलीस कोठडी सूनावली आहे.