जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरासह राज्यातील अनेक मनपामध्ये मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या नूतनीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. न्यायालयाचे निर्णय आपल्या विरोधात आहे त्यामुळे शासनाच्या मागे लागून कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मार्ग नाही, असे प्रतिपादन व्यापाऱ्यांची शिखर संस्था कॅटचे राष्ट्रीय संघटन मंत्री तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले.
कॅट आणि जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ, जिंदा, लघु उद्योग भारती संस्था, महाराष्ट्र चेंबर आँफ कोमर्स आयोजित व्यापाऱ्यांचा मेळावा शुक्रवारी पांझरापोळ संस्थानमध्ये आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. व्यापारी मेळाव्याच्या व्यासपीठावर वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगरिया, जळगाव जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय काबरा, कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे लघु उद्योग भारतीचे किशोर ढाके, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष संजय दादलीका, कँट चे जिल्हा अध्यक्ष संजय शाह आदी उपस्थित होते.
ललित गांधी पुढे म्हणाले की, आपल्याकडे व्यापाऱ्यांमध्ये मोठी उदासीनता आहे. जळगावात स्थानिक स्तरावर व्यापाऱ्यांनी आजवर अनेकवेळा पाठपुरावा केला परंतु त्यावर तोडगा निघाला नाही. शासनाच्या प्रत्येक कामात आपण योगदान देतो तरीही व्यापाऱ्यांबद्दल हव्या त्या सुधारणा, बदल होत नाही. कोरोना काळात देखील आपण २४ तास सेवा केलेली आहे. कुणीही धजावत नसताना आपण जीवाची पर्वा न करता सेवा दिली. इतके करूनही आपल्या एकही समस्येची दखल घेतली जात नाही. कोरोना काळात अनेक नियम बदलण्यात आले, व्यापाऱ्यांना त्याचा त्रास झाला तरीही त्यांचे कार्य सुरूच होते, असे ते म्हणाले.
उद्योग क्षेत्रात आपण पुढे आलो पण आज जेवढा वेळ व्यवसाय, व्यापाराला देतो त्यापेक्षा जास्त वेळ जीएसटीच्या कागदपत्रांची पूर्तता करायला द्यावा लागतो. जीएसटी कायद्यात आजवर शेकडो सुधारणा करण्यात आल्या परंतु अजूनही तो कायदा सुटसुटीत नाही. जीएसटी पोर्टल एकही दिवस व्यवस्थित चालले नाही. मुळात करप्रणालीतील पूर्ण यंत्रणाच भ्रष्टाचारी आहे. व्यापाऱ्यांची सहनशीलता संपली आहे, असे मत ललित गांधी यांनी व्यक्त केले.
जळगाव विमानतळ कार्यान्वित झाले असले तरी अद्यापही विमानसेवा सुरळीत झालेली नाही. जळगाव विमानसेवेला मुंबई येथे स्लॉट उपलब्ध करून घ्यावे, तसेच जळगाव-पुणे, जळगाव-इंदोर विमानसेवा सुरू करावी यासाठी पाठपुरावा करण्याचा मुद्दा पुरुषोत्तम टावरी यांनी मांडला. तसेच जीएसटीविषयी सविस्तर विवेचन करून कर सल्लागार समितीचे अध्यक्ष सुरेश लोढा यांनी ५० पानी निवेदन ललित गांधी यांना दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गांधी यांनी तर आभार किशोर ढाके यांनी मानले.