नवी दिल्ली – जगातील सर्वाधिक वेगवान कोरोना लसीकरण मोहिम राबवणारा भारत हा असून त्यानुसार, भारतात केवळ सहा दिवसांत १० लाख कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली.
याबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, आपण सहा दिवसांत १० लाख जणांना लस दिली. ती अमेरिकेने १० दिवसात, १२ दिवसात स्पेनने, १४ दिवसात इस्रायलने, १८ दिवसात युकेने, १९ दिवसात इटलीने, २० दिवसात जर्मनीने तर युएईला यासाठी २७ दिवस लागले.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आज दुपारी २ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आजवर २५ लाखांहून अधिक लसीचे डोस भारताने दिले आहेत. देशात अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असून सध्या देशभरात १,७५,००० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्णसंख्या कमी होण्याचा हा ट्रेन्ड कायम आहे.
सध्या देशातील दोन राज्यांमध्ये ४०,००० आणि त्याहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या दोन राज्यांमध्ये देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ६७ टक्के रुग्ण आहेत. यामध्ये केरळमध्ये ७२,००० तर महाराष्ट्रात ४४,००० आहेत. देशातील कोरोनाबाधितांचे प्रमाण ५.५१ टक्के असून ते सातत्याने कमी होत आहे. दरम्यान, ओडिशा, हरयाणा, राजस्थान, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही राज्ये चांगली कामगिरी करत आहेत. या राज्यांमध्ये ३५ टक्क्यांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. तर तामिळनाडू, दिल्ली, झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात २१ टक्क्यांहून कमी लसीकरण झाले आहे.