अनूपपूर (मध्य प्रदेश) – गेल्या काही दिवसांपासून देशातील पेट्रोलचे दर हे प्रचंड वेगाने वाढत चालले आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये पेट्रोलच्या किमतीने दरवाढीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मध्य प्रदेशमधील अनूपपूर जिल्ह्यात प्रीमियम पेट्रोलचे दर हे १०० रुपये प्रतिलिटरच्या पुढे पोहोचले आहेत. देशात पहिल्यांदाच पेट्रोलच्या दरांनी एक लिटरसाठी शंभरीचा आकडा ओलांडला आहे.
अनूपपूरमध्ये पेट्रोलचे दर शंभरीपार गेले असताना मध्य प्रदेशमधील भोपाळ, इंदूर, जबलपूरमध्ये पेट्रोलची किंमत अनुक्रमे ९४.१८, ९४.२७ आणि ९४.१८ रुपये एवढी झाली आहे. गतवर्षी १६ मार्च रोजी भोपाळमध्ये पेट्रोलचे दर ७७.५६ रुपये प्रतिलिटर पर्यंत पोहोचले होते. मध्य प्रदेशमध्ये गत एक वर्षात सुमारे १७ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढले आहेत.
पेट्रोलच्या दरांचे संपूर्ण गणित पाहिल्यास एक लिटर पेट्रोलची किंमत ही ३० रुपये आहे. त्यावर सरकारचा कर, डीलर्स कमिशन आणि ट्रान्सपोर्टेशननंतर हे दर ९४ रुपयांपर्यंत पोहोचत आहेत.
पेट्रोलची किंमत आणि त्यावरील इतर करांचं गणित पुढीलप्रमाणे आहे. एक लिटर पेट्रोलची किंमत ३० रुपये असते. त्यावर केंद्र सरकार एक्साइज ड्युटीच्या रूपात सुमारे ३३ रुपये आकारते. त्यानंतर विविध राज्यांचा कर लागतो. त्यावर डिलरचे प्रतिलिटर कमिशन ३.५० रुपये आणि ट्रान्सपोर्टेशन खर्च २.५० रुपये आकारला जातो.