यावल (रविंद्र आढाळे) । सेवानिवृत्त शिक्षकाला पेन्शन निश्चिती व उपदान मिळण्यासाठी तीन हजारांची लाच मागून ती स्वीकारतांना येथील पंचायत समितीत कार्यरत वरिष्ठ सहाय्यकाला आज लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा लाऊन अटक केली आहे.
तक्रारदार हे जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले असून कायमस्वरूपी सेवानिवृत्ती वेतन निश्चीती व उपदान मिळण्यासाठी वरीष्ठांकडे अहवाल सादर केला होता. दरम्यान हा अहवाल वरीष्ठांकडे पाठविण्यासाठी यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेले कर्मचारी सिकंदर सायबु तडवी (वय-५६) रा. यावल यांनी पैश्यांची मागणी केली. आज तडजोडीअंती तीन हजार रूपयांची रक्कम स्विकारतांना संशयित आरोपी सिकंदर तडवी याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
ही कारवाई जळगाव लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक गोपा ठाकूर, पो.नि. निलेश लोधी, पो.नि. संजोग बच्छाव, सफौ रविंद्र माळी,पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, पोहेकॉ सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, पोना मनोज जोशी, पोना सुनिल शिरसाठ, पोना जनार्धन चौधरी, पोकॉ प्रविण पाटील, पोकॉ नासिर देशमुख, पोकॉ ईश्वर धनगर यांनी कारवाई केली.