जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवार दि. २६ जानेवारी रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कोरोना निर्मूलनाच्या कामात सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याऱ्या सर्व घटकांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला.
सुरुवातीला सकाळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी ध्वजारोहण करीत ध्वजाला सलामी दिली. यावेळी डॉ. रामानंद यांनी उपस्थित वैद्यकीय यंत्रणेशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोरोना काळात डॉक्टर्सपासून सफाई कामगारांपर्यंत सर्वच घटकांनी सर्वोत्तम कामगिरी केली. प्रतिकूल परिस्थितीत देखील खंबीरपणे उभे राहत केलेली रुग्णसेवा हि प्रशंसनीय आहे. कक्षसेवकांसह स्वच्छता करणाऱ्या व सफाई कामगारांची भूमिका अधिक मोलाची राहिली आहे. कोरोना आज आटोक्यात आला असला तरी आता कोरोना व्यतिरिक्त व्याधींवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची अविरत सेवा आपल्याला करायची आहे, असेही डॉ. रामानंद म्हणाले.
यानंतर कोरोना महामारी विरोधात ज्यांनी अमूल्य योगदान दिले अशा सर्वच घटकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. यात दोन्ही उप अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, अधिसेवीका, इन्चार्ज परिचारिका, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, विभागप्रमुख, कोरोना तपासण्यासाठी नमुने घेणारी टीम, ईसीजी तंत्रज्ञ प्रतिनिधी, चतुर्थश्रेणी कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, सफाई कामगार प्रतिनिधी यांचा सन्मान झाला. याशिवाय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात विनामूल्य मनमोहक रंगरंगोटी करून जुन्या वास्तूला देखणे व नयनरम्य करणारे प्रा. अविनाश काटे, प्रा. वैशाली काटे आणि त्यांच्या टीमचे देखील प्रमाणपत्र देऊन कौतूक करण्यात आले. सूत्रसंचालन जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी यांनी केले.