मुंबई – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आज एकूण ११९ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
पद्म पुरस्कारांमध्ये उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंताना सन्मान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर समाजसेविका सिंधुताई सपकाळ, पुरुषोत्तम गंगावणे, नामदेव कांबळे, जयंतीबेन पोपट, गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर, सिंधुताईसह इतरही पुरस्कारप्राप्त मान्यवरांशी लोकमतने फोनवरुन संपर्क साधला. त्यावेळी, सिंधुताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मी कधी कल्पना केली नाही, असं काही तरी घडलं आहे. मला फक्त जगायचं आणि जगवायचं होतं. एवढाच फक्त माझा उद्देश होता. माझी लेकरं, लोकांनी दिलेला आधार आणि माझ्या कार्याची वेळोवेळी दखल घेत, सहकार्य करीत कामाला सन्मान प्राप्त करून देणाऱ्या ‘लोकमत’ला देखील मी हा ‘पद्मश्री’ समर्पित करत आहे, असे सिंधुताई सपकाळ यांनी पुरस्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं. या पुरस्कारानंतर सिंधुताई सपकाळ यांचं मुख्यंमत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांनीही अभिनंदन केलंय.
नामदेव कांबळे
सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे.आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे. यामुळे साहित्य लेखनाची जबाबदारी खूप वाढली आहे. आता अजून गांभीर्याने लिहावे लागेल. सध्या हाताशी नवीन लेखन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र कथेच्या रुपात मांडतोय, हा एक नवीन प्रयोग आहे. आतापर्यंत असे चरित्र आलेले नाही. – नामदेव कांबळे, शिरपूर, ता. मालेगाव, जि. वाशिम, पद्मश्री पुरस्कार प्राप्त
गिरीष प्रभुणे
सामाजिक क्षेत्रात काम सुरू केले तेव्हा अनेकांच्या सहकार्याने हे काम करू शकलो. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्नेही, प्रचारक दामूअण्णा दाते, मुकुंदराव पणशीकर, रमेश पतंगे तसेच भटक्या विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते या सर्वांचा समावेश आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे या विषयाला न्याय देण्यात मला यश मिळाले. महाराष्ट्रात पारधी म्हटले की चोऱ्या माऱ्या, दरोडे असे असायचे. पण यावर्षी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १०० पारधी महिला, पुरुष निवडून आले. या लोकशाहीच्या प्रवाहात माझा खारीचा वाटा आहे, याचे मला समाधान आहे. – गिरीश प्रभुणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते