फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची सुरेख गोलंदाजी आणि त्यांना इतरांनी भेदक मारा करत दिलेली साथ या जोरावर RCB ने शारजाच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा धुव्वा उडवला. मोठा विजय १९५ धावसंख्येचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या KKR च्या फलंदाजांची पुरती दाणादाण उडाली. KKR चा संघ केवळ ११२ धावांपर्यंत मजल मारु शकला आणि RCB ने ८२ धावांनी विजय मिळवत आपला विजयरथ प्ले-ऑफच्या शर्यतीत आणला आहे. RCB कडून फलंदाजीत एबी डिव्हीलियर्सने आक्रमक अर्धशतक झळकावलं, पण संघाचे गोलंदाज हे खऱ्या अर्थाने विजयाचे शिल्पकार ठरले. मोठा विजय झाला आहे.
१९५ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने सावध सुरुवात केली. संघात स्थान मिळालेल्या टॉम बँटनला गिलसोबत सलामीला संधी देण्यात आली. मात्र नवदीप सैनीने आपल्या सुरेख इनस्विंगवर बँटनचा त्रिफळा उडवत कोलकात्याला पहिला धक्का दिला.
यानंतर कोलकात्याच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. नितीश राणा, शुबमन गिल, दिनेश कार्तिक, मॉर्गन, रसेल असे नावाजलेले फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. RCB कडून युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन फिरकीपटूंनी दहाव्या षटकापर्यंत सुंदर मारा करत KKR च्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं.
RCB चा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर देवदत पडीकल आणि फिंच यांनी संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. कोलकात्याच्या गोलंदाजांचा समाचार घेताना दोन्ही फलंदाजांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली.
पडीकलने ३२ धावा केल्या. यानंतर फिंच आणि विराट कोहलीने पुन्हा एकदा भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू फिंचला बाद करत प्रसिध कृष्णाने KKR ला दुसरं यश मिळवून दिलं.
डिव्हीलियर्सने महत्वाची भूमिका बजावत KKR च्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मैदानात चौकार-षटकारांची आतिषबाजी करत डिव्हीलियर्सने संघाला मोक्याच्या षटकांमध्ये महत्वपूर्ण धावा जमवून दिल्या. डिव्हीलियर्सने नाबाद ७३ तर विराट कोहलीने नाबाद ३३ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. KKR कडून प्रसिध कृष्णा आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
अजून वाचा
पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित


