मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि उपनगरात आज अचानक वीजप्रवाह खंडीत झाला आहे. गेल्या तासाभरापासून वीज नसल्याने त्याचा अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे.मुंबईमध्ये वीजपुरवठा करणारी कंपनी बेस्ट ने याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, ‘टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. गैरसोयीबद्दल दिलगिरी’ मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत मोठा बिघाड झाल्याचे समजत आहे.
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झाल्याचे वृत्त आहे. मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला आहे. सध्या हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे. पण यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. या तांत्रिक बिघाडाचा रायगड जिल्ह्यालाही फटका बसला असून तिथेही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.