लडाख – पाकिस्तानसह चीनसोबत तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा आणखी बळकट करण्यात आली आहे. लडाखसह सरहद्दीवरील 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 44 पुलांचे सोमवारी एकाच वेळी लोकार्पण करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे हे पूल देशासाठी समर्पित केले. या पुलांमुळे लष्कराला शस्त्रास्त्रांसह जवानांची जलद तैनाती करता येणार आहे.
पूलांचे उद्घाटन करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीमेवरील तणावाचा उल्लेख केला. आधी पाकिस्तान व आता चीनने उत्तर आणि पूर्वेकडील भागात कुरापती सुरू ठेवल्या आहेत. या दोन देशांना लागून हिंदुस्थानची जवळपास 7 हजार किलोमीटर सीमा आहे. या भागात वाढता तणाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्टय़ा नेतृत्वाखाली हिंदुस्थान सर्व आव्हानांना हिंमतीने तोंड देत आहे. किंबहुना या भागात मोठे, ऐतिहासिक परिवर्तन घडवले जात आहे. जनतेची गैरसोय दूर केली जात आहे, असे सिंह यांनी यावेळी नमूद केले. गेली कित्येक वर्षे आमच्या शस्त्रधारी जवानांना वाहतुकीची सोय नसलेल्या भागात तैनात व्हावे लागले. सीमेवरच्या पायाभूत सुविधांमधील सुधारणांची त्यांना यापुढे मोठी मदत होईल, असे ते म्हणाले.
लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर या 7 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूल उभारले गेले आहेत. कोरोना महामारी तसेच सीमेवरील तणावाचे आव्हान असताना ‘बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन’ने दिवस-रात्र मेहनत घेऊन पुलांचे बांधकाम पूर्ण केले. त्यांच्या मेहनतीला संरक्षण मंत्र्यांनी दाद दिली. तसेच त्यांनी यावेळी अरुणाचल प्रदेशातील नेचिफू बोगद्याच्या कामाचे प्रतिकात्मक भूमिपूजनही केले.
अजून वाचा
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची उत्सव योजना