पुणे ः- आज साहित्य किंवा तंत्रज्ञान कोणतेही क्षेत्र असो भारतात प्रयोग किंवा संशोधन होतांना दिसत नाही. पाशात्य देशात आस्तित्ववादाचे किंवा वास्तववादाचे वारे आले की तोच प्रवाह, प्रघात भारतीय साहित्यात दिसायला लागतो, यापेक्षा भारतात साहित्यीकांनी आणिं तंत्रज्ञानांनी ज्ञान क्षेत्रात नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे प्रकार्षाने जाणवते आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यीक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
अथर्व पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह साहित्यीक वि.दा. पिंगळे लिखीत ‘चाैकट’ या कथासंग्राहाचे प्रकाशन आज डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पी.डी. पाटील हे होते. यावेळी व्यासपीठावर पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका सायली वांजळे-शिंदे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले की, मानवी जीवनाचा प्रवाह अडवायचा म्हटला तरी अडवता येत नाही. याउपर तो अडविण्याचा प्रयत्न केलाच गेला तर तिथे बंड होते. समाजाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध होत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. पूर्वी समाजाचे नेतृत्व करणारे लोक हे साहित्यीक मनाचे होते. य़शंवतराव चव्हाण हे सर्वात मोठे उदाहरण आपल्याला माहिती आहे. पंरतू कालांतराने झटपटच्या नादात साहित्य वाचन, विवेचन, मनन, चिंतन, चर्चा आदी गोष्टींना दुय्यम स्थान देऊन राजकीय नेतृत्व पुढे येऊ लागले. यामुळे साहित्य वाचनातून जी समज येते, विचारांना खोली प्राप्त होते त्याचा अभाव दिसू लागला. राजकारणाच्या धबाडग्यात राहूनही जी राजकीय व्यक्ती त्याच्या साहित्यीक जाणीवा जागृत ठेवते, तिला सर्वच ठिकाणी मान-सन्मान मिळतो.
यावेळी बोलताना कुलपती डॉ. पी.डी.पाटील म्हणाले की, दृकश्राव्य माध्यमांमुळे बालमनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्या तुलनेत साहित्य मनांची मशागत उत्तम प्रकारे करते. लेखक, साहित्यीक हे समाजाचे दिशादर्शक असून समाजाला शहाणे करुन सोडण्याचे काम ते करीत असतात. अशा समर्पीत साहित्यीकांमुळेच समाज भरकटण्यापासून वाचतो.
साहित्यीक आणि ‘चाैकट’ या कथासंग्राचे लेखक वि.दा पिंगळे यांनी लेखकीय मनोगत व्यक्त केले. यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आणि नगरसेविका सायली वांजळे-शिंदे यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले.