जळगाव प्रतिनिधी ! उमाळा येथे राजकीय वादातून दोन गटात तलवार हल्ला झाल्याची घटना घडली. यात दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात परस्परविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
तालुक्यातील उमाळा येथे वार्ड क्रमांक दोन मधील विजयी महिला उमेदवाराचे नातेवाईक प्रकाश साहेबराव चव्हाण (वय-४५) यांना त्यांचे प्रतिस्पर्धी पाटील गटातील आठ ते ९ जणांनी बेदम मारहाण केली.
यात संशयित आरोपी राजू बाबुराव पाटील याने हातात तलवार घेवून प्रकाश चव्हाण यांच्या हातावर तलवारने वार करून गंभीर जखमी केले. तर चव्हाण गटातील तीन ते चार जणांनी देखील पाटील गटावर हल्ला करून किरण भिमराव पाटील यांच्यावर लोखंडी हत्यार घेवून वार केले. या हाणामारीत किरण पाटील आणि प्रकाश चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा परस्परविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.