पुणे : हंगामी फळांनी सध्या बाजारपेठा सजल्या आहेत. अशात आता आंबा प्रेमींसाठीही एक आनंदाची बातमी आहे. हंगामातील पहिला आंबा हा शहरातील सगळ्याच बाजारपेठांमध्ये दाखल झाला आहे. पाच डझन आंब्याच्या पहिल्या पेटीची त्याची किंमत 25,000 रुपये ठेवण्यात आली आहे. खरंतर, कोरोनाच्या संकटामुळे फळांच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा आंबाही मोलामहागाचा खावा लागणार आहे. मागच्या वर्षी याच आंब्याच्या पेटीची किंमत 21,000 रुपये होती.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक वर्षाच्या तुलनेत यंदा अल्फोन्सो आंबा हा 15 दिवसांआधीच बाजारात दाखल झाला होता. आंबा व्यापारी नामदेव रामचंद्र भोसले आणि त्यांच्या मुलांना या आंब्याची पहिली खेप मिळाली आहे. तर देवगडमधील कुणकेश्वर इथले शेतकरी रामभाऊ सावंत यांनी हे अल्फोन्सो आंबे व्यापारासाठी पाठवले आहेत.
या हंगामाचा पहिला आंबा हा व्यापारासाठी शुभ मानला जातो. इतकंच नाही तर परंपरेनुसार बाजार समिती प्रशासकाद्वारे आंब्याची पूजादेखील केली जाते. व्यापारी अनिरुद्ध उर्फ बापू भोसले, अनिकेत भोसले, ऋषिकेश भोसले, बाबासाहेब बिबवे, दत्तात्रय करमरकर, बाळासाहेब कोंडे, बाजार समितीचे माजी संचालक गणेश घुले, व्यापारी संघटनेचे उपप्रमुख युवराज काची, करण जाधव, रामदास गायकवाड, रवी कुल असे अनेक व्यापारी या पुजनावेळी उपस्थित होते.
तसं पाहायला गेलं तर हापूस आणि अल्फोन्सो आंब्यांचा खरा हंगाम अजून सुरू झालेला नाही. पण तरीदेखील हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांनी आंब्याचा व्यापार वेळीच केला. यामुळे आता 15 दिवस का होईना आंबा प्रेमींना लवकर आंबे खायला मिळणार आहे.