पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह दि. 28 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
बारावी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत सोमवारी संपली होती. मात्र, अर्ज भरताना कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांना अर्ज करता आले नाही. त्याचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली.
2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरळ डेटाबेसवरुन नियमित शुल्कासह www.mahasscboard.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यास आणखी 9 दिवसांची म्हणजे 28 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
नियमित शुल्कासह दि. 19 ते 28 जानेवारीपर्यंत, तर विलंब शुल्कासह दि. 29 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
पूर्वसूची चलनाबरोबर विभागीय मंडळात जमा करावी
अर्ज भरावयाच्या कालावधीत उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर त्यांना कॉलेज लॉगिनमधून प्रीलिस्ट उपलब्ध करुन दिलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली माहिती जनरल रजिस्टरच्या माहितीनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी तसंच पूर्वसूचीवर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी, त्यानंतर पूर्वसूची चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी.
परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारणार
12 वी चे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने त्यांचे अर्ज विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी विद्यार्थ्यांची नोंद सरळ डेटाबेसमध्ये अद्ययावत असणं आवश्यक आहे, तशी खात्री करुन घ्यावी.