जळगाव : फत्तेपूर ता. जामनेर येथील ट्रकचालकाच्या मुलीला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्यामुळे तिचा वेळीच जीव वाचला आहे. याबाबत मुलीच्या पालकांनी वैद्यकीय यंत्रणेचे आभार मानले आहे.
फत्तेपूर येथील ट्रक चालवून उदरनिर्वाह करणारे नजीर खान यांची मुलगी गजाला परवीन (वय १५) हिला श्वास घेण्यासाठी अडचण येत असल्याने तिला जामनेर तालुक्यातील खाजगी रुग्णालयात दाखविण्यात आले. मात्र त्यांनी दुसरीकडे जाण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी अखेर वेळ न दवडता गजाला हिस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बेशुद्धावस्थेत दाखल केले. याठिकाणी डॉ. बिलाल अन्सारी यांनी तपासणी करून तत्काळ अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले.
गजाला हिला श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे तिची प्रकृती अत्यंत खालावली होती. उपचाराअंती तिच्या छातीत कफ दाटून आल्यामुळे श्वासाला अडचण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला व्हेंटीलेटर लावून औषधोपचार सुरु झाले. अखेर ६ दिवसांनंतर तिची प्रकृती पूर्वपदावर आली. त्यामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास टाकत डॉक्टरांचे आभार मानले.
गजाला हिच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयातील उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इमरान पठाण, डॉ. विशाल अंबेकर, डॉ. संदीप बोरसे, अधिपरिचारिका प्रतिभा गावित, तृप्ती चित्ते यांच्यासह रेडक्रॉस सोसायटीचे गनी मेमन, जामनेर येथील सामाजिक कार्यकर्ते जननायक फाउंडेशनचे शफी खान, फरीद खान, आरोग्यदूत मन्सूर बाबा, सय्यद चाहत, हरुण पिंजारी यांनी सहकार्य केले.