जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रताप नगरातून रस्त्याने जात असलेल्या तरुणाच्या हाताला अज्ञात चोरट्यांनी धक्का मारून मोबाईल लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री येथील मूळ रहिवाशी शंकर बापू कोळेकर वय २५ हा तरुण नोकरीनिमित्ताने शिव कॉलनी येथील त्रिमूर्ती हॉटेलच्या मागे राहतो. शंकर हा ऑर्किड हॉस्पिटल येथे पार्टटाइम जॉब करतो. शनिवारी रात्री ऑर्किड हॉस्पिटलमधून काम आटोपल्यानंतर शंकर हा नेहमीप्रमाणे शिवकॉलनीतील राहत असलेल्या घराकडे पायी जात होता. पाऊणे ११ वाजेच्या सुमारास प्रतापनगरातील पोलिस लाइन जवळ असलेल्या अनुव्रत भवनसमोर रस्त्यावर चालत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी शंकर याच्या हाताला झटका देत त्याचा चार हजार रूपये किंमतीचा मोबाइल लांबवला. शंकर यास काही कळण्याच्या आत मोबाइल हिसकावून नेल्यानंतर तिघेही आस्वाद हॉटेलच्या दिशेने पसार झाले. शंकर कोळेकर याने तक्रारींसाठी १७ जानेवारी रोजी सकाळी जिल्हापेठ पोलिस स्टेशन गाठले.
तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मगन मराठे हे करीत आहेत.