जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अद्ययावत झालेल्या दंतोपचार विभागात शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पाहणी करून प्रशंसा केली.
शासकीय रुग्णालयातील दंतोपचार विभागमध्ये अत्याधुनिक स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्याद्वारे तोंडाच्या आणि दाताच्या अतिशय दुर्मिळ प्रकरणांवर उपचार करणे आता सोपे झाले आहे. येथे तज्ज्ञ डॉक्टर्सची टीमदेखील शासकीय रुग्णालयाला मिळाली असून आता तोंडाच्या कर्करोगावर देखील उपचार सुरु झाले आहे. एका वेळी चार रुग्णांना तपासता येतील अशी यंत्रणा येथे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली उभारली गेली असून शासकीय रुग्णालयाच्या विकासात महत्वाची भूमिका दंतोपचार विभाग पार पाडत आहे.
‘कोविशील्ड’ लसीच्या सुरुवातीसाठी आले असताना पालकमंत्री, आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी उपलब्ध सुविधेचे कौतुक केले. या विभागाची माहिती विभागप्रमुख तथा उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण यांनी मान्यवरांना दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण उपस्थित होते. प्रसंगी दंतोपचार विभागातील वरिष्ठ निवासी डॉ. अनुराधा वानखडे, कनिष्ठ निवासी डॉ. सतीश सुरळकर, डॉ. राखी यादव उपस्थित होते.