भुसावळ प्रतिनिधी । शहरातील भुसावळातील लोणारी मंगल कार्यालयाजवळ जुन्या वादातून पुन्हा गोळीबार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांना पाहून गोळीबार करून पळ काढण्याच्या प्रयत्नात असणार्या पाच गुन्हेगारांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक करण्यात आली.
भुसावळ शहर पोलीस स्थानकाचे पथक हे नियमित गस्त घालत असतांना त्यांना लोणारी समाज मंगल कार्यालयाजवळ काही जण संशयास्पद स्थितीत असल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यातील एकाने हवेत गोळीबार करून सर्वांनी तेथून पळ काढला. दरम्यान, गोळी झाडल्यानंतर पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून राजू बारे, भूषण यशवंत मोरे, विल्सन अलेक्झांडर जोसेफ (२७), सागर आनंदा पारधे (३०), ऑस्टीन शरद रामटेके (२१ ) यांना अटक केली. हे सर्व जण हुडको कॉलनीतील रहिवासी आहेत. भुसावळ शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने ही कामगिरी केली.
यात इकबाल अली इब्राहीम अली सैय्यद, भूषण चौधरी, समाधान पाटील व चंद्रशेखर गाडगीळ यांचा समावेश होता. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरिक्षक बाळासाहेब ठोंबे यांनी घटना स्थळा भेट दिली. दरम्यान, थेट पोलिसांवरच गोळीबार करण्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी निर्भयपणे गुन्हेगारांना अटक केल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.