जळगाव – मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा, महत्त्वपूर्ण व पवित्र सण जश्ने ईद – ए – मिलादुन्नबी जगभरात मोठ्या आनंदात, उत्साहात व जल्लोषात जुलूस काढून रोशनाई करून साजरा केला जातो. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक लॉकडाऊन लावलेला होता. त्यामुळे सर्वधर्मीय भाविकांना आपले सण साजरा करता आलेले नाहीत.
परंतु काही प्रमाणात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने काही अटी व शर्तींवर लॉकडाऊन शिथिल करून मार्केट, बाजार, दुकाने, बियर शॉपी सह बरेच काही उघडण्याची परवानगी दिलेली आहे.
त्याच प्रमाणे जश्ने ईद – ए – मिलादुन्नबी निमित्त दि. ३०-१०-२०२० शुक्रवार रोजी निघणाऱ्या जुलूस – ए – ईद – ए – मिलादुन्नबी (शोभा यात्रा ) काढण्याची सुद्धा काही अटी शर्तींवर जसे सोशल डिस्टंसिंग ( सामाजिक अंतर), मास्क, सॅनिटायझर, वयोमर्यादा ( लहान मुले व वयस्कर व्यक्ती वगळता ), डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी सुन्नी मुस्लिम बांधव आशिके रसूल पारंपारिक रीतीने व मार्गाने रीतसर परवानगी घेऊन जुलूस काढतात. त्या सर्वांना व जळगाव शहराच्या मरकझी जुलूसला कृपया परवानगी देण्यात यावी, अशी विनंती आज जळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री. डॉ. प्रवीण मुंडे साहेब यांना जळगाव जिल्ह्याच्या सुन्नी मुस्लिम धर्मगुरूंच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन साकडे घातले.
यावेळी पोलीस अधीक्षकांनी सुन्नी धर्मगुरूंच्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. पोलीस दल नेहमी आपल्या सहकार्यासाठी २४ तास तत्पर असून सणासुदीच्या काळात पोलीस दलात सहकार्य करावे असे आवाहन केले. त्यास सुन्नी मुस्लिम धर्मगुरुंच्या शिष्टमंडळातर्फे सै. अयाज अली नियाज अली यांनी पोलिस दलास सदैव मदत राहील असे सांगितले.
याप्रसंगी सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव, मरकझ सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट जळगाव, व जुलुस – ए – ईद मिलादुन्नबी कमिटी जळगाव चे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, मौलाना नजमूल हक मिस्बाही, मौलाना मुबारक हुसैन कादरी, मौलाना वासेफ रजा रझवी, मौलाना नौशाद साबरी, मौलाना अब्दुल हमीद रजवी, मौलाना रफिक रझवी, सय्यद जावेद, फिरोज खान, सय्यद उमर, आदी उपस्थित होते.