सिंगापूर – कोरोना व्हायरसबद्दल सुरूवातीपासूनच नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाची चाचणी लवकरात लवकर करता यावी, तसेच वेळ आणि पैसे या दोन्हींची बचत करण्यासाठी वेगवेगळ्या देशातील शास्त्रज्ञांचे संशोधन सुरू होते. आता सिंगापूरमधील शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या टेस्टबाबत एक नवीन तंत्र विकसित केलं आहे. याद्वारे फुंकर मारून कोरोना व्हायरसची लागण झाली आहे की नाही, याबाबत माहिती मिळवता येईल.
या तंत्राच्या मदतीने श्वासांमध्ये असलेल्या ऑर्गेनिक कंपाऊंडद्वारे कोरोना व्हायरस आहे की नाही याबाबत माहिती घेतली जाईल. विशेष म्हणजे या चाचणीसाठी १ मिनिटापेक्षा कमी कालावधी लागणार आहे. या चाचणीचे परिणाम हे ९० टक्के अचूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. सिंगापूरमध्ये हे टेस्ट किट तयार करण्यात आलं आहे. यामुळे कोरोनाची चाचणी कमी वेळात करता येऊ शकते. या चाचणीत फक्त फुंकर मारल्यानंतर चाचणी निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह हे पाहण्यास मदत होईल.
अशी ठरणार चाचणी प्रभावी..
सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, याद्वारे कोरोना व्हायरसची चाचणी १ मिनिटात होऊ शकते. व्यक्तीच्या श्वासांमधील ऑर्गेनक कंपाऊडद्वारे व्हायरसच्या अस्तित्त्वाबद्दल माहिती मिळवता येऊ शकते. या तंत्राच्या आधारे चाचणी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्रीथ सॅम्पलरमध्ये असलेले माऊथपीस नमुन्यांवर फुंकर मारावी लागणार आहे.
नॅशनल युनिव्हर्सिटीने दावा केला आहे की, या टेक्निकचा वापर करून १८० रुग्णांवर परिक्षण केलं जाणार आहे. स्टार्टअप सीईओ डू फँग यांनी सांगितले की,” ब्रीथ सॅम्पलरमध्ये असलेले माऊथपीस डिस्पोजेबल असतील. त्यामुळे फुंकर मारल्यानंतर पुन्हा हवा आत जाऊ शकणार नाही. कारण हे मशिन वन वे वाल्व असून त्यात सलायवा ट्रॅप लावली आहे.” स्टार्टअप ब्रीथॉनिक्सच्या सीईओ डॉ. जिया झूनान यांनी दिलेल्या माहितीनुसार ,”वेगवेगळे आजार झाल्यानंतर श्वासांमध्ये बदल होतात. त्यामुळे तोंडातून सोडलेल्या वाष्पशील ऑर्गेनिक कम्पाऊंड्सद्वारे व्हायरसच्या अस्तित्वाबाबत माहिती मिळवता येऊ शकते. कोरोना व्हायररसच्या चाचणीसाठी हे चांगले तंत्र आहे.