जळगाव- राष्ट्रीय कृषी विकास योजना सन २०२०-२१ अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबविण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेतंर्गत रोपवाटिकेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक शेतक-यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
या योजनेत टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिकेची उभारणी करायची असून यामध्ये ३.२५ मी. उंचीचे Fiat type शेडनेटगृह उभारणी प्लॉस्टिक टनेल, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर व प्लॉस्टिक क्रेटस इत्यादी घटकांतर्गत मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ५०% प्रमाणे २ लाख ३० हजार रुपये अनुदान देय राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असलेल्या शेतक-यांना अर्ज करणेसाठी दिनांक २ नोव्हेंबर, २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
त्यानुसार शेतक-यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेकडे ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
लाभार्थी निवडीचे निकष – अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान ०.४० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे, रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करतांना अर्जदाराने अर्जासोबत स्वत: ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, इत्यादी कागदपत्रे सादर करावीत.
प्राप्त लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थी निवडीच्या प्राधान्यक्रमानुसार तालुकास्तरावर सोडत पध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येईल. महिला कृषी पदविकाधारकांना प्रथम प्राधान्य राहिल, महिला गट/महिला शेतकरी व्दितीय प्राधान्य राहिल, भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्पभुधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहिल.
योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी सहाय्य्क/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका कळविले आहे.