जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवजात शिशु कक्षात आपत्कालीन संकटाच्या दृष्टीने यंत्रणा अद्ययावत असून शनिवारी राज्य शासनाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत त्याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्याबद्दल राज्याच्या आरोग्य यंत्रणेने जळगाव रुग्णालयाच्या यंत्रणेबद्दल समाधान व्यक्त केले.
भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नवजात शिशु कक्षात आग लागल्यामुळे गुदमरून १० नवजात शिशुंचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्य शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने संध्याकाळी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची माहिती ऑनलाईन जाणून घेतली. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ.वैभव सोनार, बालरोगतज्ज्ञ व विभागप्रमुख डॉ.बाळासाहेब सुरोसे, डॉ.वृषाली सरोदे उपस्थित होते.
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवार ९ जानेवारी रोजी २५ नवजात शिशु दाखल असून त्यात १० रुग्णालयातील तर १५ इतर रुग्णालयातून उपचारासाठी दाखल झालेले आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ६ अग्निशमन मशीन नवजात शिशु कक्षात दाखल आहेत. तसेच वीज यंत्रणा अद्ययावत असून तत्काळ सेवेसाठी अधिक क्षमतेचे इन्व्हर्टर उपलब्ध आहेत. त्यासह २४ तास कार्यरत असणारा डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका कायम सेवेत आहेत. अशी माहिती अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे.